Join us  

बिश्नोईविरोधात लुकआउट...सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरणात पोलिसांची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2024 7:13 AM

पंजाबमधून अटक केलेल्या दोघांना दंडाधिकारी न्यायालयाने शुक्रवारी ३० एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली

मुंबई : बॉलीवूड अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार केल्याप्रकरणी तुरुंगात कैद असलेल्या कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा धाकटा भाऊ अनमोल बिश्नोई याच्या विरोधात मुंबई पोलिसांनी शुक्रवारी लुकआउट नोटीस (एलओसी) जारी केली.

अनमोल बिश्नोई हा विदेशात वास्तव्यास असून त्याच्या नावाने गोळीबाराची जबाबदारी स्वीकारण्यात आली होती. पोलिस तपासातही अनमोल बिश्नोईचा सहभाग दिसून आला होता. या गुन्ह्यात त्याला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले आहे, तसेच गुन्ह्यातील पाहिजे आरोपी लॉरेन्स बिश्नोईचाही पोलिस ताबा घेण्याची शक्यता आहे. लॉरेन्स बिश्नोई सध्या गुजरातमधील साबरमती येथील तुरुंगात आहे.

गुन्हे शाखेने केलेल्या तपासात पंजाबमधून अटक केलेल्या आरोपी सोनू कुमार बिश्नोई आणि अनुज थापन यांना पंजाबमधून शस्त्रे मुंबईत आणून ती पाल आणि गुप्ता यांना देण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. त्यानुसार, विमानाने मुंबईत येऊन १५ मार्चला या दोघांनी शस्त्रे पाल आणि गुप्ताला पोच केली. यासाठी दोघांना ३५ हजार रुपये देण्यात आले होते. बिश्नोई आणि थापन दोघेही मोबाइल फोनद्वारे पाल आणि गुप्ताच्या संपर्कात होते.

३० एप्रिलपर्यंत पोलिस कोठडीपंजाबमधून अटक केलेल्या दोघांना दंडाधिकारी न्यायालयाने शुक्रवारी ३० एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. गोळीबार करणाऱ्यांना शस्त्र आणि काडतुसे पुरवणाऱ्या सुभाष चंदर (३७) आणि अनुज थापन (३२) या दोघांना गुन्हे शाखेने गुरुवारी पंजाबमधून अटक केली. चंदर आणि थापन या दोघांनाही शुक्रवारी मुंबईतील दंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आले. 

चंदर व थापन यांनाही शस्त्र कोणी दिली आणि सलमानच्या इमारतीवर गोळीबार करणाऱ्या शूटर्सना शस्त्र देण्याचा आदेश त्यांना कोणी दिला, याची चौकशी दोघांकडे करायची आहे, असे पोलिसांनी कोठडी मागताना न्यायालयाला सांगितले. चंदर आणि थापन यांचा बिश्नोई टोळीशी संबंध नाही. त्यांना खोट्या प्रकरणात गोवण्यात आले आहे, असा युक्तिवाद आरोपींचे वकील अजय दुबे यांनी न्यायालयात केला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेत आरोपींना न्यायालयाने ३० एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

एनआयएकडून चौकशीगोळीबारप्रकरणी अटकेत असलेल्या सागर पाल आणि विकी गुप्ता या दोन संशयित आरोपींची चौकशी आता राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) अधिकाऱ्यांनीही सुरू केली आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांसोबत एनआयएच्या अधिकाऱ्यांनी या दोन संशयित आरोपींची चौकशी केली आहे. या प्रकरणात काही आंतरराष्ट्रीय धागेदोरे गुंतले आहेत का, याचा तपास करण्यासाठी एनआयएच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केल्याचे समजते.    

टॅग्स :सलमान खान