- रेश्मा शिवडेकर (विशेष प्रतिनिधी)
मुंबई विद्यापीठ वर्षाला साधारणपणे ३५०-४०० पीएच. डी. बहाल करते. अर्थशास्त्र, भौतिकशास्त्र, गणित, भाषा अशा विषयांतील हे संशोधनकार्य आतापर्यंत विद्यापीठांच्या ग्रंथालयातच धूळ खात पडून असे. आता मुंबई विद्यापीठातीलच नव्हे तर देशातील ७५०हून अधिक विद्यापीठे आणि शिक्षण संस्थांतील वर्षानुवर्षे खपून लिहिलेले १० लाखांहून अधिक प्रबंध शोधगंगाच्या माध्यमातून सर्वसामान्यांसाठी खुले झाले आहेत.
एमफील, पीएचडीचे हे प्रबंध खरेतर ज्ञानाचा व माहितीचा मोठा दस्तऐवज असतो. तो भारताबरोबरच जगभरातील विद्यार्थी, अभ्यासक, संशोधकांना उपलब्ध व्हावा, या विचारातून ‘शोधगंगा’चा उगम झाला. केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या पुढाकाराने अस्तित्त्वात आलेली ‘शोधगंगा’ ही देशभरातील प्रबंधांची जननी म्हणजे एक इलेक्ट्रॉनिक / डिजिटल डिपॉझिटरी आहे. यामुळे अभ्यासकांना त्यांच्या पूर्वसूरींनी केलेले ज्ञानाचे भांडार खुले झाले आहे. कुणीही शोधगंगाच्या संकेतस्थळावर जाऊन कुठलेही विद्यापीठ, विषय, लेख, वर्ष निवडून हवा तो प्रबंध काढून वाचू शकतो. डाऊनलोड करू शकतो.
विद्यापीठ अनुदान आयोगाने नियम करून सर्व विद्यापीठांना या प्रबंधांची इलेक्ट्रॉनिक प्रत (सीडी) देणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे नवीन प्रबंध सहजपणे अपलोड होतात. परंतु, त्याआधीच्या पुस्तकरुपातील प्रबंध स्कॅन करून त्यावर योग्य प्रक्रिया करून ते शोधगंगावर उपलब्ध करून देण्यात येत आहेत. प्रबंध जितके जुने तितके ते स्कॅन करून अपलोड करण्याचे काम जिकिरीचे. अनेकदा जुन्या प्रबंधांची पाने पिवळी झालेली, डागाळलेली असतात. अशा पानांचे प्रथम स्कॅनिंग केले जाते. त्यानंतर त्याची छायाप्रत वाचनयोग्य आणि सुस्पष्ट दिसावी, यासाठी तिचे ओसीआरमध्ये (ऑप्टिकल कॅरेक्टर रिडर) रुपांतर करावे लागते. यात मजकुरातील डाग काढून ती पाने स्वच्छ केली जातात.
शोधगंगेवर मुंबई विद्यापीठ कुठे? महाराष्ट्रात पुण्याने सर्वाधिक म्हणजे १२ हजार ४६१ प्रबंध उपलब्ध करून दिले आहेत. मुंबई विद्यापीठाने १९३० पासूनचे १० हजारांहून अधिक प्रबंध उपलब्ध करून दिले आहेत. अत्यंत जुने आणि स्कॅनिंगचे आव्हान असलेले जवळपास ५०० ते ७०० प्रबंध शेवटच्या टप्प्यात उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. देशात अण्णा विद्यापीठ (१५,४६६) प्रबंध अपलोड करण्यात आघाडीवर आहे.
अनेकदा काही नामांकित संशोधकांची प्रबंध पुस्तकरुपाने प्रकाशित होतात. परंतु, आर्थिक गणित न जुळल्याने चांगले संशोधकार्य प्रकाशात येत नाही. आता ते संशोधन, अभ्यास, लेखनासाठी संदर्भ म्हणून वापरता येईल. मुंबई विद्यापीठात अनेक नामांकित व्यक्तींनी संशोधन कार्य केले. ते या निमित्ताने उपलब्ध होईल. याशिवाय विद्यापीठाकडे पूर्वी संलग्नित असलेल्या बीएआरसी, टीआयएफआर या संशोधन संस्थांमधील प्रबंधही खुले झाले आहेत.