मुंबई : लालबागला दोन गटांमध्ये झालेल्या हाणामारीनंतर अवघ्या काही सेकंदांतच अफवांना पाय फुटले आणि शहरातले वातावरण क्षणात तणावपूर्ण बनले. हा तणाव निवळला असला तरी अजूनही काही समाजकंटकांकडून हेतुपुरस्सरपणे अफवा किंवा धर्मभावना दुखावतील असे चिथावणीखोर मेसेज पसरविले जात आहेत. यामुळे भविष्यात शहरातली कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, शांतता नांदावी यासाठी मुंबई पोलीस बंदोबस्तासह सोशल मीडियावर करडी नजर ठेवून आहेत. फेसबुक, टिष्ट्वटर, व्हॉट्सअॅपवरून आक्षेपार्ह मजकूर पसरविणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई करण्याची तजवीज पोलिसांनी केली आहे.मुंबई पोलिसांकडे सोशल मीडिया लॅब, सायबर सेल व सायबर पोलीस ठाणे अशी सायबर गुन्हे रोखण्यासाठी तसेच गुन्ह्यांच्या तपासासाठी यंत्रणा कार्यरत आहे. या सर्व यंत्रणांमधील अनुभवी अधिकारी, कर्मचारी लालबाग घटनेच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर बारीक लक्ष ठेवून आहेत. सोशल मीडियावर एखादा आक्षेपार्ह मजकूर पडल्यास तो पुढे पसरू नये यासाठी ब्लॉक किंवा परस्पररीत्या डिलीट केला जात आहे, अशी माहिती उपायुक्त धनंजय कुलकर्णी यांनी लोकमतला दिली. तसेच चिथावणीखोर, धर्मभावना भडकावतील असा मजकूर हेतूपुरस्सर पसरविणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करणार, असेही कुलकर्णी यांनी स्पष्ट केले.याशिवाय पोलिसांनी ठिकठिकाणी बंदोबस्त ठेवला आहे. राजकीय, धार्मिकदृष्ट्या संवेदनशील ठिकाणांवरील गस्त वाढविली आहे. पोलीस ठाण्यातील मिल स्पेशल युनिट्सकरवी त्या त्या परिसरातील हालचालींची माहिती काढण्यात येत आहे. तसेच शहरातील सक्रिय धर्मवादी संघटना, त्यांचे म्होरके, कार्यकर्ते यांच्यावरही पोलिसांची नजर आहे. पोलीस ठाण्यांच्या पातळीवर मोहल्ला समित्यांच्या बैठका सुरू झाल्या आहेत. स्थानिक धर्मगुरू किंवा जनमानसात चांगली ओळख असलेल्यांकरवी पोलीस सर्वत्र शांततेचा संदेश देत आहेत. अफवांवर विश्वास ठेवू नका, अफवा पसरवू नका, हेही सांगण्यात येत आहे. (प्रतिनिधी)पोलीस उपायुक्त संजय बारकुंड (अभियान) यांनी आपले विशेषाधिकार वापरून हे आदेश जारी केले आहेत. त्यानुसार फटाके वाजविणे, आकाशात दिवे किंवा रॉकेट सोडणे, आपटी बार, ज्यांचे वजन २१ ग्रॅमपेक्षा जास्त आणि लांबी ४ सेंटीमीटर असेल असे फटाके वाजविण्यावर बंदी घातली आहे. या सूचनेचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १३३(१) अन्वये कारवाई करण्यात येईल. ज्यात आठ दिवसांपर्यंत कैद किंवा १२५० रुपये दंड ठोठावला जाऊ शकेल.लालबागच्या घटनेनंतर पोलिसांनी शहरात जमावबंदी लागू केली. त्यानंतर मंगळवारपासून ४ फेब्रुवारीपर्यंत फटाके वाजविण्यावरही बंदी घातली.
सोशल मीडियावर करडी नजर
By admin | Updated: January 7, 2015 01:14 IST