Join us

उत्सवावर पोलिसांची करडी नजर

By admin | Updated: August 28, 2014 01:35 IST

गणेशमूर्तींचे दर्शन किंवा देखावे पाहण्यासाठी येणाऱ्या महिला भाविकांच्या सुरक्षेसाठी स्वतंत्र रांग ठेवावी, अशी सूचना मुंबई पोलिसांनी तमाम सार्वजनिक गणेश मंडळांना केली आहे.

मुुंबई : गणेशमूर्तींचे दर्शन किंवा देखावे पाहण्यासाठी येणाऱ्या महिला भाविकांच्या सुरक्षेसाठी स्वतंत्र रांग ठेवावी, अशी सूचना मुंबई पोलिसांनी तमाम सार्वजनिक गणेश मंडळांना केली आहे. मुंबई पोलिसांच्या माहितीनुसार शहरात ६७१२ सार्वजनिक गणेश मंडळे आहेत. त्यापैकी सर्वच मंडळांमध्ये व्हीआयपी पास, मुखदर्शन आणि सर्वसामान्य भाविक असेच रांगांचे वर्गीकरण असते. मात्र महिलांविरोधी गुन्हे रोखण्यासाठी पुरुष आणि महिला भाविकांना स्वतंत्र रांगांची व्यवस्था मंडळांनी करावी, अशा सूचना देण्यात आल्याचे पोलीस सहआयुक्त धनंजय कमलाकर यांनी दिली. याशिवाय मंडपाभोवती मुबलक प्रकाशयोजना असावी, असेही मंडळांना सूचित केल्याचे त्यांनी सांगितले. गर्दीच्या ठिकाणी छेडछाड, विनयभंग, सोनसाखळी चोरी हे महिलांविरोधी गुन्हे मोठ्या प्रमाणावर घडू शकतात. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी इव्ह टीझिंग स्क्वॉड (छेडछाड विरोधी पथके) तयार केली आहेत. या पथकांमध्ये महिला पोलिसांचा सहभाग असेल. पथक साध्या कपड्यांमध्ये गर्दीत मिसळून करडी नजर ठेवेल. विशेष म्हणजे पोलिसांनी दोन ते तीन आठवड्यांआधीपासूनच प्रतिबंधात्मक कारवाईचा धडाका सुरू केला आहे. अभिलेखावरील गुन्हेगार, महिलांविरोधी गुन्ह्यातील सराईत, गुन्हे करणारे अशा सर्वांना मुंबई पोलीस कायदा, केंद्रीय फौजदारी कायद्यातल्या विविध तरतुदींनुसार नोटिसा धाडण्यात आल्या आहेत. (प्रतिनिधी)