मुंबई : पाणी ही काळाची गरज आहे. मुंबई असो किंवा कोणतेही शहर असो; आजघडीला प्रत्येकाने जल संवर्धनासाठी पावले उचलली पाहिजेत. केवळ स्थानिक प्राधिकरणे नव्हे तर जल साक्षरता, जन जागृती करत जलस्रोतांच्या संवर्धनासाठी धोरणे राबवत ती कृतीत उतरविली पाहिजेत. उद्योग, शेतीसाठी दीर्घकालीन अशा शाश्वत जलस्रोतांचा विकास केला पाहिजे, असे मत नवी दिल्ली येथील इस्रायलच्या वाणिज्य दूतावासाचे जल अधिकारी डॉ. लिओर असाफ यांनी नोंदविले.
कॉऊंस्युलेट जनरल ऑफ इस्रायल इन मुंबई यांच्याद्वारे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि ऑब्झर्व्हर रिसर्च फाऊंडेशनच्या वतीने १ सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता फोर्ट येथील दलाल स्ट्रीटवरील बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या बोर्ड रुमध्ये मुंबई-इस्रायल वॉटर को -ऑपरेशन या विषयावर आयोजित चर्चासत्रात डॉ. लिओर असाफ बोलत होते.
डॉ. लिओर असाफ हे गेल्या २० वर्षांपासून पर्यावरण क्षेत्रात कार्यरत आहेत. पर्यावरणाशी निगडित अनेक प्रकल्पात त्यांनी काम केले असून, इस्रायल, यूएसए, हिताई, श्रीलंका, इथिओपियासह अनेक देशात काम केल्याचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. भूजल हा त्यांचा अभ्यासाचा विषय असून, विविध प्रकल्पाद्वारे यांनी त्याचा अभ्यास केला आहे. जल व्यवस्थापन आणि जल पुरवठा नियोजनाशी निगडितदेखील त्यांनी काम केले आहे. सौरऊर्जा प्रकल्प, धरण संरचना, शाश्वत विकास, पर्यावरणाशी निगडित सर्व्हे अशा अनेक कामाचा त्यांना अनुभव आहे.
डॉ. लिओर असाफ म्हणाले, भारत आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे. येथील लोकसंख्या वाढत आहे. येथील वाढत्या लोकसंख्येला पाणीपुरवठा करण्यासाठी येथील प्राधिकरणे सक्षम आहेत. मात्र जलसंवर्धन करताना शाश्वतीकरण करणे म्हणजे केवळ तंत्रज्ञानाचा वापर करणे असे होत नाही. तर पुढील पिढ्यांना पाण्याबाबत साक्षर करणे आणि त्यांना जल व्यवस्थापनाचे महत्त्व पटवून देणे होय. लोकांचा राहणीमानाचा दर्जा उंचावताना आपण जलस्रोतांच्या संवर्धनावर भर दिला पाहिजे. नव्याने धोरणे आखली पाहिजेत. कायद्याची अंमलबजावणी केली पाहिजे आणि या माध्यमातून जलसंवर्धन करत पाण्यासाठी जनजागृतीदेखील केली पाहिजे.
पाणी कसे वापरायचे?
पाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी पुन्हा वापरता आले पाहिजे. म्हणजे पाणी दोनवेळा वापरता आले पाहिजे. पाणी ही लोकांची संपत्ती आहे. तिलासुद्धा जपले पाहिजे. जमिनीतील गळती म्हणजे भूगर्भात जलवाहिन्यांच्याद्वारे जे पाणी वाया जात आहे, अशा गळत्या शोधल्या पाहिजेत. त्याचे विश्लेषण केले पाहिजे. पाण्याची मागणी, पाण्याचे व्यवस्थापन आणि जलस्रोतांचे व्यवस्थापन केले पाहिजे. उद्योग आणि शेतीसाठी दीर्घकालीन अशा शाश्वत जलस्रोतांचा विकास केला पाहिजे.
शहरी भागात जलव्यवस्थापन अवश्य केले पाहिजे आणि प्रकल्पांसाठी धोरण आखले पाहिजे. मुंबईसारखी शहरे असोत किंवा इतर कोणती शहरे, प्रत्येकाला पाणी मिळाले पाहिजे. भूगर्भातील पाण्याचा वापर नियोजन करत केला पाहिजे.