कांदिवली : रस्त्यावर धावणाऱ्या हजारो रिक्षा आणि खासगी वाहनांसाठी अवघ्या दोन वा तीन पेट्रोलपंपांवर सीएनजी गॅस भरण्याची व्यवस्था असल्याने रिक्षांसोबत खासगी वाहनांच्याही लांबच लांब रांगा लागल्या आहेत. हीच स्थिती सध्या कांदिवली पश्चिम येथील महावीरनगर येथील पेट्रोलपंपावरही दिसून येत आहे. यामुळे वाहतुकीची कोंडी होतेच, शिवाय प्रवाशांचे हालही होत आहेत. तुटवड्यामागील कोणतीही ठोस भूमिका शासनाकडून जाहीर न झाल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये नाराजी दिसून येत आहे.उपनगराचा झपाट्याने होणारा विकास आणि वाढत्या लोकसंख्येमुळे सीएनजीचा वापर करीत असलेली हजारोंच्या संख्येने रिक्षासह खाजगी वाहने आहेत. मालाड ते दहिसरपर्यंत फक्त १३ पेट्रोलपंपांवर सीएनजी गॅस भरण्याची व्यवस्था आहे. त्यातील निम्म्या ठिकाणी सीएनजी गॅस पेट्रोलपंपावर सध्या नाही.रस्त्यावरच आता कोणत्याही वेळेस गेल्यास जवळपास १०० रिक्षा व खासगी वाहने रांगेत असल्याने लिंक रोडवरील पेट्रोलपंपावरील रिक्षांची रांग प्रगती नगरपासून ते पारिजात सोसायटीपर्यंत तर चारकोप पोयसरची रांग सेक्टर ६, आदर्शनगर ते एकता नगर लिंक रोडपर्यंत लागते. दोन्हीही रांगा वसंत कॉम्प्लेक्सच्या मुख्य सिग्नलवरून वळसा मारून पेट्रोलपंपाकडे लिंक रोडवर दुतर्फा लागतात. एकूणच सीएनजीच्या तुटवड्यामुळे वाहनधारकांचे सध्या मोठे हाल होत आहेत. (प्रतिनिधी)
सीएनजीसाठी लांबच लांब रांगा
By admin | Updated: December 16, 2014 01:38 IST