Join us
Daily Top 2Weekly Top 5

विकास आराखड्याविरोधात चेंबूरमध्ये लाँग मार्च

By admin | Updated: April 20, 2015 01:21 IST

महापालिकेने २०१४ ते २०३४ या २० वर्षांचा आराखडा बनवला आहे. या आराखड्यात अनेक त्रुटी असल्याने संपूर्ण शहरातून त्यास विरोध होत आहे.

१ महापालिकेने २०१४ ते २०३४ या २० वर्षांचा आराखडा बनवला आहे. या आराखड्यात अनेक त्रुटी असल्याने संपूर्ण शहरातून त्यास विरोध होत आहे. अशाच प्रकारे चेंबूरमधील रहिवाशांनी देखील विकास आराखड्याला विरोध दर्शवत आज चेंबूरमध्ये लाँग मार्च काढून निषेध व्यक्त केला. मुंबईच्या विकास आराखड्यात मंदिर, मशीद, चर्च अशा प्रार्थनास्थळांचा समावेश रहिवासी आणि व्यावसायिक विभागात करण्यात आला आहे. त्यामुळे संपूर्ण मुंबई शहरातून पालिकेच्या या आराखड्याविरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे. २ चेंबूर परिसरातदेखील अशाच प्रकारे अनेक रहिवासी घरांना व्यावसायिक इमारती दाखवल्या आहेत. शिवाय येथील डायमंड उद्यान ते आंबेडकर उद्यान या रस्त्यावरी फूटपाथ फेरीवाल्यांच्या घशात जाणार आहे. त्यामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होईल. शिवाय हा परिसर सध्या शांत परिसर म्हणून ओळखला जातो. त्यामुळे या ठिकाणी फेरीवाले आल्यास येथील शांतता भंग होईल, असे रहिवाशांचे म्हणणे आहे. ३ त्यातच चेंबूर परिसर हा मुंबईतील सर्वात प्रदूषणाचा परिसर आहे. त्यामुळे विकास आराखड्याचे नियोजन करताना अनेक झाडांची कत्तल होणार आहे. परिणामी चेंबूरमधील प्रदूषणात आणखीच वाढ होणार आहे. पालिकेने निदान झाडे तुटणार नाहीत, याचा विचार करून तरी हा विकास आराखडा बदलावा, या मागणीसाठी सेंट अ‍ॅन्थोनी होम्स को-आॅपरेटिव्ह सोसायटी आणि अग्नी या सामाजिक संस्थेतर्फे आज ही निषेध रॅली काढण्यात आली. परिसरातील तीनशे ते चारशे रहिवासी या रॅलीत सहभागी झाले होते.