मंत्रिमंडळाचा निर्णय : बाबासाहेबांचे घर आंतरराष्ट्रीय स्मारकगौरीशंकर घाळे - मुंबईलंडन येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे घर आंतरराष्ट्रीय स्मारक म्हणून विकसित केले जाणार आहे; शिवाय बाबासाहेब आंबेडकरांच्या वास्तव्याने ऐतिहासिक बनलेल्या या वास्तूत राहण्याची संधीही राज्यातील विद्यार्थ्यांना मिळणार आहे. परदेशात शिक्षण घेण्यासाठी दरवर्षी राज्य शासनाकडून ५० विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. त्यापैकी जे विद्यार्थी लंडनमध्ये शिक्षण घेत असतील त्यांना या वास्तूत राहण्याची संधी लाभेल. १९२१-२२ या कालावधीत बाबासाहेबांनी लंडन येथील १० किंग्ज हेन्री रोड येथील घरात वास्तव्य केले होते. राज्य शासन हे घर खरेदी करणार असून, तेथे स्मारक उभारणार आहे. ४१ कोटींच्या या वास्तूच्या देखभालीसाठी दरमहा ६१ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. लंडनमध्ये शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांची या वास्तूत निवासाची सोय केली जाणार आहे. या माध्यमातून २७ लाख रुपये उभारले जाणार असून, उर्वरित रक्कम सामाजिक न्याय विभाग देणार असल्याची माहिती राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी दिली. तब्बल २ हजार ५०२ चौरस फुटांच्या या वास्तूतील आपल्या वास्तव्यादरम्यान बाबासाहेबांनी लंडन स्कूल आॅफ इकॉनॉमिक्समधून डीएस्सी इन इकॉनॉमिक्स् आणि ग्रेझ् इन या संस्थेतून बॅरिस्टर अॅट लॉ या पदव्या संपादित केल्या; शिवाय या कालावधीत त्यांनी विविध विषयांवरील महत्त्वपूर्ण संशोधनही केले होते. अशी ही ऐतिहासिक वास्तू विकत घेण्यास राज्य शासनाने मान्यता दिली असून, त्यासाठीचा ५ कोटींचा पहिला हफ्ताही लवकरच दिला जाणार आहे.
लंडनचे ‘ते’ स्मारक विद्यार्थ्यांसाठीही
By admin | Updated: February 4, 2015 03:10 IST