Join us  

LMOTY 2018: राहुल धूत यांचा 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर २०१८' पुरस्कारानं सन्मान

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2018 7:29 PM

धूत ट्रान्समिशन प्रायव्हेट लिमिटेड म्हणजेच डीटीपीएलची स्थापना २१ व्या शतकाच्या उंबरठ्यावर १९९९-२००० मध्ये झाली. कंपनीचे औरंगाबाद, दिल्ली, पुणे आणि चेन्नई येथे उत्पादन युनिट्स असून त्यामधील कर्मचाऱ्यांची संख्या ३ हजारहून अधिक आहे. २०१७ मध्ये डीटीपीएलने स्कॉटलंड येथील टीएफसी कंपनी ताब्यात घेतली.

ठळक मुद्देराहुल धूत हे स्वत: इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड टेलिकम्युनिकेशन क्षेत्रात बीई झाले आहेत. आतापर्यंत विविध पुरस्कारांनी त्यांचा सन्मान करण्यात आला आहे. सीआयआयसह अनेक महत्त्वाच्या उद्योग संघटनांशी ते संलग्न आहेत.

राहुल धूत यांचा 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर २०१८' पुरस्कारानं सन्मान

मुंबईः उद्योग क्षेत्रात उत्कृष्टतेचा ध्यास घेऊन आपली वेगळी छाप उमटवणाऱ्या राहुल धूत यांना 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर २०१८' पुरस्कारानं गौरवण्यात आलं.  अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते राहुल धूत यांचा सन्मान करण्यात आला. 

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्काराचं हे पाचवं पर्व आहे. राजकारण, समाजसेवा, कला, क्रीडा, प्रशासन, उद्योग अशा विविध विभागांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शिलेदारांना हा पुरस्कार प्रदान केला जातो. मान्यवर परीक्षकांनी केलेलं मूल्यमापन आणि वाचकांचा कौल या आधारे हा विजेता निश्चित करण्यात येतो. वरळीच्या भव्य एनएससीआय डोममध्ये सुरू असलेल्या दिमाखदार सोहळ्यात राहुल धूत यांचा मानाच्या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. 

औरंगाबादच्या धूत ट्रान्समिशन प्रायव्हेट लिमिटेड आणि मंगलम कॉइल्सचे युवा संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक असलेले राहुल धूत हे अचूकतेच्या जिद्दीसाठी ओळखले जातात. केवळ १७ वर्षांच्या कालावधीत त्यांचा समूह ऑटोमोटीव्ह इलेक्ट्रॉनिक्स, वायरिंग, पॉवर वायर्स, कॉपर वायर्स, केबल्स, कपलिंग्स आणि स्वीच यांचा देशातील महत्त्वाचा पुरवठादार ठरला. हा समूह विदेशातील ऑटोमोबाइल उत्पादक आणि इलेक्ट्रॉनिक्स कंपन्यांनाही वस्तूंचा पुरवठा करण्याच्या क्षेत्रातही प्रसिद्ध आहे. 

धूत ट्रान्समिशन प्रायव्हेट लिमिटेड म्हणजेच डीटीपीएलची स्थापना २१ व्या शतकाच्या उंबरठ्यावर १९९९-२००० मध्ये झाली. कंपनीचे औरंगाबाद, दिल्ली, पुणे आणि चेन्नई येथे उत्पादन युनिट्स असून त्यामधील कर्मचाऱ्यांची संख्या ३ हजारहून अधिक आहे. २०१७ मध्ये डीटीपीएलने स्कॉटलंड येथील टीएफसी कंपनी ताब्यात घेतली. त्याचे उत्पादन युनिट स्लोवाकियात आहे. अमेरिकेतील कार्लिंग टेक्नॉलॉजीस या कंपनीशीही डीटीपीएलने संयुक्त करार केला आहे. २००१ मध्ये केवळ ६० लाख रुपये उलाढाल असलेल्या डीटीपीएलचा आताच्या घडीचा वार्षिक व्यवसाय ८०० कोटी रुपयांवर गेला आहे. औरंगाबादच्या शेंद्रा व इंदूरजवळील पिथमपूर येथील विशेष आर्थिक क्षेत्रात कंपनीचे निर्यात युनिट आहे. राहुल धूत हे स्वत: इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड टेलिकम्युनिकेशन क्षेत्रात बीई झाले आहेत. आतापर्यंत विविध पुरस्कारांनी त्यांचा सन्मान करण्यात आला आहे. सीआयआयसह अनेक महत्त्वाच्या उद्योग संघटनांशी ते संलग्न आहेत.

टॅग्स :लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर २०१८