Join us  

ऊर्मिलाने घेतली शरद पवारांची भेट, लढ्याला बळ मिळाल्याचं ट्विट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2019 1:29 PM

उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस आघाडीच्या उमेदवार अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली.

मुंबई - उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस आघाडीच्या उमेदवार अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. गुरुतुल्य आणि उत्तुंग व्यक्तिमत्व असणाऱ्या शरद पवारांच्या मार्गदर्शनामुळे माझा प्रवास विजयाकडेच जाईल असा विश्वास ऊर्मिलाने व्यक्त केला.  

आज सकाळी ऊर्मिला मातोंडकरने शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी ऊर्मिलासोबत तिचा पती मोहसीन आणि काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. जवळपास अर्धा तास ऊर्मिला यांची शरद पवारांशी चर्चा सुरु होती. माझ्या लढ्याला बळकटी दिल्याबद्दल शरद पवार यांचे आभार मानल्याचं ऊर्मिलाने सांगितले.

उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीकडून ऊर्मिला मातोंडकर निवडणूक लढवत आहे. या मतदारसंघात भाजपा-शिवसेना युतीकडून विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी यांनाच पुन्हा तिकीट देण्यात आलं आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत गोपाळ शेट्टी यांनी संजय निरुपम यांचा पराभव करत विक्रमी मताधिक्याने उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात विजय मिळवला होता. मात्र यंदाच्या लोकसभा निवडणुकीत संजय निरुपम यांना दिवंगत गुरुदास कामत यांच्या मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून काँग्रेसकडून तिकीट देण्यात आली आहे. त्यामुळे उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी काही दिवसांपूर्वी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर यांना संधी देण्यात आली. 

उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाची लढत गोपाळ शेट्टी आणि ऊर्मिला मातोंडकर यांच्यात रंगतदार होणार आहे. कारण याच लोकसभा मतदारसंघात अभिनेता गोविंदाने भाजपाकडून तीन वेळा खासदार म्हणून निवडून गेलेले राम नाईक यांचा धक्कादायक पराभव केला होता. त्यामुळे पुन्हा एकदा सेलेब्रिटी उमेदवार देऊन काँग्रेसकडून हा मतदारसंघ ताब्यात घेण्याचा प्रयत्न आहे. 

या मतदारसंघातील गोरेगाव पूर्व व पश्चिम, मालाडचा मालवणी, कांदिवलीतील चारकोप, डहाणुकर वाडी, बोरिवलीतील गोराई, पूर्वेकडील म्हाडा कॉलनी, अशोक नगर आदी भागांत मराठी वस्ती मोठी आहे. कापड गिरण्या बंद पडल्यावर बरेच कामगार गोराई, चारकोप भागात स्थायिक झाले आहेत. त्यामुळेच काँग्रेसने मराठी चेहरा देण्याचे ठरविल्याचे दिसते. याशिवाय गोरेगाव, मालाड व बोरिवली येथे ख्रिश्चन मतदारांचे प्रमाण मोठे आहे, तर मालवणीमध्ये मुस्लीम मतदारही मोठ्या प्रमाणात आहेत. ही मते काँग्रेसकडे वळण्याची शक्यता अधिक आहे. मतदारसंघात उत्तर भारतीय व गुजराती मतदारही मोठ्या प्रमाणात आहेत. त्यापैकी गुजराती मते भाजपाची मानली जातात. पण उत्तर भारतीयांची बरीच मते काँग्रेसकडे वळू शकतील असा दावा काँग्रेसकडून केला जातोय. 

 

टॅग्स :लोकसभा निवडणूकशरद पवारउर्मिला मातोंडकरमुंबई उत्तरमहाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019