Join us  

लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातून अजूनही माघार नाही - अर्जुन खोतकर 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2019 10:15 AM

अजूनही निवडणुकीच्या रिंगणातून मी माघार घेतली नाही. ही जागा मी लढवेन असा इशारा शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी दानवेंना नाव घेता दिला आहे

मुंबई - जालना लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यास मी इच्छुक आहे, अजूनही युतीच्या जागा वाटपात कोणताही निर्णय झाला नाही. उद्धव ठाकरेंनी आदेश दिल्यास लोकसभा निवडणूक लढण्यास सज्ज आहे. अजूनही निवडणुकीच्या रिंगणातून मी माघार घेतली नाही. ही जागा मी लढवेन असा इशारा शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी दानवेंना नाव घेता दिला आहे. एबीपी माझा या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत खोतकरांनी निवडणुकीच्या आखाड्यात आपण उभे आहोत हे स्पष्ट केलं आहे. 

यावेळी बोलताना अर्जुन खोतकर म्हणाले की, शिवसेना-भारतीय जनता पार्टीच्या युतीचा निर्णय वरिष्ठ नेत्यांनी घेतला असली तरी शिवसैनिकांच्या भावना वेगळ्या आहेत, ज्येष्ठ नेत्यांनी घेतलेला युतीचा निर्णय मान्य करावा लागेल. युतीचे आम्ही स्वागत करु मात्र स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांच्या भावना काय आहेत याची परिस्थिती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सांगितली आहे. त्यामुळे ते जो निर्णय घेतील तो मान्य असेल. 

आजपर्यत जालना लोकसभा मतदारसंघातून भाजपचे रावसाहेब दानवे निवडणूक लढवत आलेत. दानवे यांचा प्रचार शिवसैनिकांनी प्रामाणिकपणे केला आहे. मात्र निवडणुकीनंतरच्या काळात अनेकांना अपमानास्पद वागणूक दिली जाते. अनेक कामांसाठी रखडवण्यात येत त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये दानवे यांच्याविरोधात नाराजी आहे. शिवसैनिकांच्या भावना लक्षात घेऊन, कार्यकर्त्यांच्या हिताचा, माझ्या हिताचा निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेतील असा विश्वास अर्जुन खोतकर यांनी व्यक्त केला. 

जालना लोकसभेबाबत अजूनही कोणता निर्णय झाला नाही, अद्याप कोणताही निरोप मला आलेला नाही, त्यामुळे मी अजूनही निवडणुकीतून माघार घेतलेली नाही असंही खोतकरांनी सांगितले आहे त्यामुळे लोकसभा निवडणुकीत जालना लोकसभा मतदारसंघात युतीसाठी काहीही आलबेल नसल्याचं चित्र समोर येतंय

मंगळवारी रात्री उशिरापर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात युतीबाबत निवडणुकीची रणनिती ठरविण्याची बैठक झाली. यामध्ये जालना आणि ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघाबाबत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. महायुतीत जागांचा फॉर्म्युला ठरला असला तरी काही जागांचा तिढा अजूनही सुटलेला नाही.  

टॅग्स :लोकसभा निवडणूकअर्जुन खोतकरशिवसेनाजालनारावसाहेब दानवे