Join us  

लखपतीचे झाले करोडपती पण, उमेदवाराकडे "ना बंगला, ना गाडी"

By मनीषा म्हात्रे | Published: May 01, 2024 6:05 AM

भांडुप पश्चिमेकडील दीना बामा पाटील इस्टेटमध्ये पत्नी आणि दोन मुलींसोबत राहणारे संजय पाटील हे वाणिज्य शाखेत पदवीधर आहेत.

मनीषा म्हात्रे

मुंबई : महाविकास आघाडीचे उमेदवार संजय दिना पाटील यांनी मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदार संघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. गेल्या १५ वर्षात लखपतीचे कोट्याधीश झालेल्या संजय पाटील यांच्याकडे ना स्वत:चे घर आहे. ना वाहन. फक्त वडिलोपार्जित अडीचशे फुटाचे घर असून त्याचेही प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याचे त्यांनी निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. 

भांडुप पश्चिमेकडील दीना बामा पाटील इस्टेटमध्ये पत्नी आणि दोन मुलींसोबत राहणारे संजय पाटील हे वाणिज्य शाखेत पदवीधर आहेत. निवडणूक आयोगाला सादर केलेल्या माहितीत, गेल्या पाच वर्षात त्यांच्या उत्पन्नात चढउतार दिसून आले. २०१९-२० मध्ये त्यांचे उत्पन्न ८ लाख १९ हजार ४२० होते. २० - २१ मध्ये कोरोनाच्या काळात ते थेट ४४ लाख ६९ हजारांवर पोहचले. २१-२२ मध्ये हा आलेख पुन्हा खाली येत १४ लाख २५ हजारांवर आला. २२-२३ मध्ये १५ लाख ४९ हजार तर २३-२४ मध्ये १८ लाखांवर आहे.

२००९ मध्ये संजय दिना पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर उत्तर पूर्व मधून विजयी झाले होते. तेव्हा त्यांची जंगम मालमत्ता २६ लाख ३७ हजार होती. २०१४ मध्ये हा आकडा दीड कोटींवर पोहचला. २०२४ मध्ये हाच आकडा दोन कोटी ३० लाखांवर पोहचला आहे.  २०१९ च्या तुलनेत २०२४ मध्ये त्यांच्या जंगम मालमत्तेत २६ लाखांची वाढ झाली आहे. स्थावर मालमत्तेत वडिलोपार्जित अडीचशे फुटाचे घर असून त्याची बाजार किंमत १८ लाख असून, त्यांच्याकडे एकही वाहन नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे घराबाहेर लागलेला आलिशान गाड्यांचा ताफा नेमका कुणाचा? असाही प्रश्न येथे उपस्थित होत आहे.  

पाटील कुटुंबाकडे ४६ तोळे सोने

पाटील यांच्याकडे ५ तोळे, पत्नी पल्लवी यांच्याकडे ३० तर दोन्ही मुलींकडे एकूण साडे अकरा तोळे सोने आहे.

नवी दिल्लीच्या बँक खात्यात सर्वाधिक रोकड

२०१९ च्या प्रतिज्ञापत्रानुसार नवी दिल्लीच्या बँक खात्यासह चार बँक खात्यात बचत, ठेवी होत्या. यात दिल्लीतील खात्यात सर्वाधिक १ कोटी ४६ लाख होते. २०२४ तब्बल १२ बँक खात्यात बचत, एफडी आहे. 

गेल्या पाच वर्षांतील उत्पन्न

वर्ष                      उत्पन्न

२०१९ - २०       ८,१९,४२०

२०२० - २१.       ४४,६९,११०

२०२१ -२२          १४,२५,८७०

२०२२ - २३.       १५,४९,६४०

२०२३ - २४        १८,०६,४००

गेल्या चार लोकसभा निवडणुकीतील मालमत्तांचा आलेख

वर्ष       जंगम मालमत्ता

२००९   २६,३७, ६२२

२०१४   १,६०,६५,७५५

२०१९   २,०३,७७,८४०

२०२४   २,३०,१०,५७४

टॅग्स :लोकसभा निवडणूक २०२४