Join us  

माशाच्या पिल्लाला पोहायला शिकवावं लागत नाही; पार्थ पवारचं सत्यजीत तांबेंकडून स्वागत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2019 8:25 PM

सत्यजीत तांबे यांनी आज 'लोकमत'च्या वाचकांशी फेसबुक लाइव्हद्वारे मनमोकळा संवाद साधला.

देशाच्या राजकारणातील 'वजनदार' नेते शरद पवार यांचे नातू, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. आपल्या नातवाला पुढे आणण्यासाठी आजोबांनी माघार घेतलीय. स्वाभाविकच, मावळ मतदारसंघात पार्थ पवार काय किमया करतात, याबद्दल राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे. त्यांच्या प्रचाराकडे नजरा लागलेल्या असताना, पहिल्याच - तीन मिनिटांच्या भाषणातही ते अडखळले. अडखळल्याने सोशल मीडियावर पार्थची खिल्ली उडवली जातेय. परंतु, अन्य पक्षातील युवा नेते त्यांच्या पाठीशी भक्कम उभे राहिल्याचं पाहायला मिळतंय. पार्थ पवार हे लंबी रेस का घोडा असल्याचं मत स्वाभिमानी संघटनेचे नेते नितेश राणे व्यक्त केलंय, तर प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनीही पार्थ पवार हळूहळू तयार होतील, असा विश्वास व्यक्त केला आहे. 

सत्यजीत तांबे यांनी आज 'लोकमत'च्या वाचकांशी फेसबुक लाइव्हद्वारे मनमोकळा संवाद साधला. त्यावेळी अहमदनगर जिल्ह्यातील राजकारण, घराणेशाही, केंद्रातील मोदी सरकारविरोधात त्यांनी केलेली आंदोलन, भविष्यातील वाटचाल यासंबंधी विविध प्रश्नांना त्यांनी उत्तरं दिली. त्यावेळी एका वाचकाने, पार्थ पवारच्या पहिल्या भाषणाबद्दलचा प्रश्न विचारला होता. युवकांचे नेते म्हणून पार्थ पवार यांच्याकडे कसे पाहता, तीन मिनिटांच्या भाषणातही अडखळलेल्या पार्थची पुढची वाटचाल कशी असेल, याबद्दलचं मत त्यानं विचारलं होतं. त्यावर सत्यजीत यांनी एका वाक्यात समर्पक उत्तर दिलं. 

माशाच्या पिल्लाला पाण्यात पोहायला शिकवावं लागत नाही. भाषण करायला हळूहळूच शिकतो, पार्थही नक्की शिकेल, असा विश्वास सत्यजीत तांबे यांनी व्यक्त केला.

राजकारणातील घराणेशाहीबद्दल सातत्याने चर्चा होते. सत्यजीत हे काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचे भाचे आहेत. त्यामुळे अनेकांनी सत्यजीत यांना घराणेशाहीविषयी प्रश्न विचारले होते. त्यावर ते म्हणाले, घराणेशाहीपासून कोणतंच क्षेत्र लांब राहिलेलं नाही. वारशाने किंवा घराणेशाहीने तुम्हाला संधी मिळते, पण कर्तृत्व सिद्ध करावंच लागतं. राजकारणातील घराणेशाहीला दर पाच वर्षांनी परीक्षा द्यावी लागते, याकडे त्यांनी लक्ष वेधलं. 

टॅग्स :लोकसभा निवडणूकसत्यजित तांबे