Join us  

Lockdown: सर्वसामान्यांना दिलासा द्या; 'आप'कडून उद्या राज्यभरात 'वीजबिल माफ करा' आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Published: June 02, 2020 8:08 AM

या आंदोलनाद्वारे राज्यभरात जिल्हाधिकारी, तहसीलदार यांच्याकडे निवेदन सादर करून राज्याच्या महाविकास आघाडीच्या सरकारकडे ही मागणी पोहचवण्यात येणार आहे

मुंबई - कोविड-19 च्या संकटामुळे राज्यातील सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक परिस्थती बिकट बनली आहे. या परिस्थतीमध्ये त्यांना आर्थिक मदत मिळणे गरजेचे बनलेले आहे. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या 20 लाख कोटीच्या पॅकेजमध्ये सामान्य माणसाला कोणतीही थेट मदत मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारने आता त्वरित राज्यातील नागरिकांचा आर्थिक ताण हलका करण्याच्या दृष्टीने पावले उचलून त्यांना दिलासा देणे गरजेचे आहे अशी मागणी राज्यातील आम आदमी पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. 

याशिवाय आम आदमी पार्टी महाराष्ट्राच्या वतीने राज्यातील वीज ग्राहकांची लॉकडाऊन काळातील २०० युनिट पर्यंतची वीजबिले माफ करावीत ही मागणी घेऊन उद्या दि. ३ जून रोजी राज्यभर आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाद्वारे राज्यभरात जिल्हाधिकारी, तहसीलदार यांच्याकडे निवेदन सादर करून राज्याच्या महाविकास आघाडीच्या सरकारकडे ही मागणी पोहचवण्यात येणार आहे. तसेच राज्यभरातील वीज ग्राहकांच्या भावना अधोरेखित करणारे व्हिडीओ प्रकाशित करून ते सोशल मीडियावरद्वारे सरकारपर्यंत पोहचवण्यात येणार आहेत. या आंदोलनात आम आदमी पक्षाचे सर्व पदाधिकारी सामील होणार असून, गाव व शहर पातळीवरील सर्व वीज ग्राहक नागरिकांना वीज माफी आंदोलनात सामील करून घेतले जाणार आहे. त्याचसोबत सोशल मिडियाद्वारे व्हिडीओ प्रकाशित करून #वीजबिलमाफकरा हा हॅशटॅग सर्वत्र चालवला जाणार आहे.

तसेच दिल्ली येथील अरविंद केजरीवाल सरकार मागील दोन वर्षांपासून २०० युनिट पर्यंत वीज मोफत देत आहे याची सर्वांनाच माहिती आहे. सामान्य नागरिकांच्या लोकडाऊन काळातील विजेची बिलं माफ झाल्यास त्यांना मोठा दिलासा मिळणार असल्यामुळे 'आप'च्या वतीने ही मागणी लावून धरण्यात येणार आहे. 

टॅग्स :आपवीजराज्य सरकारअरविंद केजरीवाल