Join us
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकांसाठीच लाॅकडाऊनचा घाट - राज ठाकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : लाॅकडाऊन आवडे सरकारला, अशी स्थिती महाराष्ट्रात आहे. आगामी निवडणुकांसाठीच हा घाट घातला जात आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : लाॅकडाऊन आवडे सरकारला, अशी स्थिती महाराष्ट्रात आहे. आगामी निवडणुकांसाठीच हा घाट घातला जात आहे. सध्या सगळ्यांना बंद करून ठेवायचे. सर्व आखणी झाली, कार्यक्रम झाले, तयारी झाली की आयत्या वेळेला निवडणुका जाहीर करायच्या. जेणेकरून बाकीचे तोंडावर पडतील, असा हा डाव असल्याचा थेट आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकारवर केला आहे.

राज्य सरकारने दहीहंडीवर घातलेली बंदी, राज्यात बंद असलेली मंदिरे या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधताना सरकार आणि शिवसेनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. राज्यात हजारो कोटींची कामे वाजवली जात आहेत. याविरोधात कुणी बोलायचे नाही, सभा नाही, मोर्चे नाही. यातील कोणत्याही गोष्टी होऊ नये, यासाठी वारंवार पहिली लाट, दुसरी लाट अशा लाटा मुद्दाम आणल्या जात आहेत, असा थेट आरोपच ठाकरे यांनी केला. सर्व गोष्टी चालूच आहेत. नारायण राणे यांच्या विरोधात जे झाले, यांच्या हाणामाऱ्या सुरू आहेत. बाकीच्या सगळ्यांचे मेळावे सुरू आहेत. शिवसेना आमदार भास्कर जाधव यांच्या मुलाने मंदिरात जाऊन अभिषेक केला. म्हणजे यांच्यासाठी मंदिरे सुरू, बाकीच्यांनी मंदिरात जायचे नाही. यांनी मेळावे, सभा घ्यायच्या, पण आम्ही दहीहंडी साजरी करायची नाही. कुठूनही गर्दी कमी झालेली दिसत आहे का, असा प्रश्न करतानाच बाळासाहेबांच्या नावाने हडपलेल्या महापौर बंगल्यात बिल्डरांच्या आणि सरकारकडून कामे करून घेण्यासाठी येणाऱ्यांच्या गाड्यांची संख्या काही कमी झाली नाही. मग, सणांवरच निर्बंध का येतात, असा प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केला.

यात्रा झाल्या, हाणामारी झाली तेव्हा कोरोना नव्हता. फक्त सणातून रोगराई पसरते का, असा प्रश्न करतानाच मनसे कार्यकर्त्यांवर सूडबुद्धीने केसेस सुरू आहेत. दहीहंडीवर निर्बंध घातले जातात. हीच शिवसेना विरोधी पक्षात असती, तर काय केले असते. मंदिरे उघडली गेलीच पाहिजेत. लवकरच पक्षातील सर्वांशी बोलणार आहे. सर्व मंदिरांसमोर घंटानाद करू. सगळे सण साजरे झाले पाहिजेत. नियम लावायचे तर सगळ्यांसाठी नियम सारखे लावा. याला वेगळा त्याला वेगळा असे चालणार नाही. बाहेर पडायला यांची फाटते यात आमचा काय दोष, असा टोलाही राज यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.

फेरीवाल्यांवर जरब बसलीच पाहिजे

केवळ निषेध करून सुधारणा होणार नाही. यांच्यावर जरब बसलीच पाहिजे. ठाण्यातील हल्लेखोर ज्या दिवशी पोलिसांकडून सुटेल त्या दिवशी मनसेकडून मार खाईल. यांची बोटे छाटली जातील, फेरीवाले म्हणून बसता येणार नाही तेव्हा यांना कळेल. राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांवर हल्ला करायची हिंमत होतेच कशी, असा प्रश्नही राज यांनी ठाण्यातील घटनेसंदर्भात बोलताना केला.