महेश कोले, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : अनेकदा अर्धजलद गाड्या ठरावीक स्टेशननंतर जलद होतात. अशावेळी त्यांना धिम्या मार्गावरून जलद मार्गावर जाण्यासाठी ट्रॅक बदलावा लागतो. मात्र, ट्रॅक बदलताना लोकल कमालीची हळू चालवावी लागते. त्यामुळे बराच वेळ जातो. परंतु आता लोकलचे हे ट्रॅक बदलणे जलदगतीने होणारा आहे. क्रॉस ओव्हर पॉइंटवर थिक वेब स्विच बसविण्याचा नवा उपक्रम पश्चिम रेल्वेने सुरू केला असून त्यामुळे क्रॉसिंगच्या ठिकाणी लोकलचा वेग ताशी ५० किमी असा असेल. आता हा वेग ताशी फक्त १५ किमी एवढाच आहे.
पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागामध्ये एकूण ९२३ क्रॉस ओव्हर पॉइंट असून त्यांपैकी ४९४ म्हणजेच ५३.५२ टक्के क्रॉस ओव्हर पॉइंटवर थिक वेब स्विच बसविण्यात आले असल्याचे रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच उर्वरित ४२९ पॉइंट अजून अपग्रेड करायचे बाकी असून, येत्या काळात सर्वच पॉइंटवर हे स्विच बसविण्यात येणार आहेत. नवीन स्विचमुळे रेल्वेची परिचालन कार्यक्षमता आणि प्रवाशांची सुरक्षितता वाढवण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या अस्तित्वात असलेल्या तंत्रज्ञानानुसार १ इन १.८ यंत्रणा असलेल्या ठिकाणी ट्रेनचा ताशी वेग १५ ठेवला जातो; तर १ इन १२ ही यंत्रणा असलेल्या ठिकाणी ट्रेनचा ताशी वेग ३० इतका ठेवण्यात येतो. नवीन अद्ययावत थिक वेब स्विचमुळे हा स्पीड ताशी ५० कि.मी. इतका ठेवणे शक्य होणार आहे.
अद्ययावत थिक वेब स्विचची वैशिष्ट्ये
अद्ययावत स्विचमुळे रूळ बदलण्याच्या ठिकाणचे भाग लवकर तुटत नसून ट्रेनच्या परिचालनामध्ये अडथळा होत नाही. तसेच झीज अत्यंत कमी होत असल्याने देखभाल-दुरुस्तीची फारशी गरज भासत नाही. वजन वहन क्षमता वाढवत असल्याने लाइफ स्पॅन वाढतो. तसेच नवीन स्विच असलेल्या भागात काही समस्या निर्माण झाल्यास त्याच्या देखभाल-दुरुस्तीसाठी कमी वेळ लागतो.