Join us  

Coronavirus मोठा निर्णय! सामान्य मुंबईकरांसाठी मध्यरात्रीपासून लोकल सेवा बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2020 11:48 PM

अत्यावश्यक सेवेवरील कर्मचाऱ्यांना ओळखपत्रं पाहून रेल्वे स्थानकात सोडणार

मुंबई: कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी उद्या (२२ मार्च) मध्यरात्रीपासून अत्यावश्यक सेवेवरील कर्मचारी सोडून सामान्य प्रवाशांना लोकलमधून प्रवास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवेवरील कर्मचाऱ्यांनादेखील त्यांची ओळखपत्रं पाहून रेल्वे स्थानकांवर सोडण्यात येईल आणि अन्य प्रवाशांना बाहेरच रोखण्यात येईल, अशी माहिती कोकण विभागीय आयुक्त शिवाजी दौंड यांनी दिली. मात्र याबद्दल अद्याप रेल्वेनं कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.सर्व रेल्वे स्थानकांवर पूर्व व पश्चिम बाजूंकडील मुख्य प्रवेशद्वारांवर पथकं नेमण्यात येणार आहेत. या पथकांत एक जीआरपी, एक रेल्वे पोलीस, महसूल विभागाचे दोन प्रतिनिधी व एक वैद्यकीय कर्मचारी असेल. हे पथक खात्री करूनच प्रवाशांना रेल्वे स्टेशनवर सोडेल, असं दौंड यांनी सांगितलं. अत्यावश्यक सेवेतील शासकीय कर्मचारी वगळता केवळ वैद्यकीय सेवेची तात्काळ आवश्यकता असणाऱ्या व्यक्तींनाच रेल्वे स्थानकावर प्रवेश देण्यात येईल, असंदेखील त्यांनी स्पष्ट केलं.पश्चिम, मध्य, हार्बर या तिन्ही मार्गांवरील सर्व रेल्वेस्थानकांसाठी हा आदेश असून उद्या मध्यरात्रीपासून पुढील सूचना येईपर्यंत हा आदेश लागू असणार आहे. त्यामुळे अनिश्चित काळासाठी सामान्यांचा लोकल प्रवास बंद झाला आहे. उद्या जनता कर्फ्यू पाळण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलंय. त्यामुळे उद्या लोकलच्या फेऱ्या कमी करण्यात आल्या आहेत. मुंबईतील लोकलच्या जवळपास ४० टक्के फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. मध्ये रेल्वेच्या ६६८ फेऱ्या रद्द करण्यात आल्या असून पश्चिम रेल्वेच्या ४७७ फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामुंबई लोकल