Join us  

मुंबईत रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2019 7:52 AM

मध्य रेल्वे मार्गावरील कल्याण ते ठाणे सीएसएमटी दिशेकडे जाणाऱ्या जलद मार्गावर सकाळी ११.२० ते दुपारी ३.५० पर्यंत मेगाब्लॉक आहे.

मुंबई : आज मुंबई उपनगरीय रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर रेल्वे रुळांची देखभाल, ओव्हर हेड वायरची दुरुस्ती यासाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वे मार्गावरील कल्याण ते ठाणे, पश्चिम रेल्वे मार्गावर मरिन लाइन्स ते माहिम, हार्बर मार्गावरील पनवेल ते वाशी, ट्रान्स हार्बर मार्गावरील पनवेल ते ठाणे यादरम्यान मेगाब्लॉक आहे.

मध्य रेल्वे मार्गावरील कल्याण ते ठाणे सीएसएमटी दिशेकडे जाणाऱ्या जलद मार्गावर सकाळी ११.२० ते दुपारी ३.५० पर्यंत मेगाब्लॉक आहे. यावेळी कल्याण ते ठाणेदरम्यान सीएसएमटी दिशेकडे जाणा-या जलद लोकल धिम्या मार्गावरून चालतील. कल्याण दिशेकडे जाणाऱ्या जलद लोकल सकाळी १०.१६ ते दुपारी ३.२२ पर्यंत संबंधित थांब्यांसह घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड आणि दिवा येथे थांबा घेणार आहेत.

पश्चिम रेल्वे मार्गावर मरिन लाइन्स ते माहिम स्थानकांदरम्यान विरार दिशेकडे जाणाऱ्या धिम्या मार्गावर सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ पर्यंत जम्बो ब्लॉक आहे. यादरम्यान विरार दिशेकडे जाणाऱ्या धिम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावर चालविण्यात येणार असल्याने महालक्ष्मी, प्रभादेवी आणि माटुंगा रोड स्थानकावर लोकल थांबा नसेल.

सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत हार्बर मार्गावरील पनवेल ते वाशी दोन्ही दिशेकडील लोकल रद्द होतील. यादरम्यान पनवेल ते अंधेरी सेवा रद्द केली आहे. ट्रान्स हार्बर मार्गावरील सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत पनवेल ते ठाणे आणि सकाळी ११.१४ ते ३.२० पर्यंत ठाणे ते पनवेल लोकल सेवा रद्द करण्यात आली आहे. ठाणे ते वाशी/ नेरूळ लोकल सेवा वेळापत्रकानुसार चालविण्यात येतील. सकाळी ११ ते दुपारी ३.३२ पर्यंत बेलापूर ते खारकोपर आणि सकाळी ११.३० ते सायंकाळी ४ पर्यंत खारकोपरहून सुटणाऱ्या लोकल रद्द करण्यात येणार आहेत.

टॅग्स :मुंबई ट्रेन अपडेटमुंबई लोकल