- रोहित नाईक, मुंबई स्थळ अंधेरी स्थानक प्लॅटफॉर्म क्रमांक ७़ वेळ दुपारी २ वाजून ४० मिनिटे... काळे टी-शर्ट घातलेल्या घोळक्याने मुंबईकरांचे लक्ष वेधून घेतले आणि ओळख पटताच मोबाइलमध्ये त्यांची छबी टिपण्यासाठी चढाओढ लागली. हा घोळका होता यंदाच्या प्रो कबड्डी चॅम्पियन ‘यू मुंबा’ संघाचा. ज्या खेळाडूंना टीव्हीवर पाहून चीअरअप केले ते अचानक समोर दिसल्याने सामान्य मुंबईकरांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. प्रो कबड्डी विजेतेपदाचा जल्लोष मुंबईकरांमध्ये मिसळून साजारा करण्याचे ठरवल्याने सोमवारी ‘यू मुंबा’ने अंधेरी ते चर्चगेट असा लोकल प्रवास केला. चर्चगेटहून ओपन जीपवर स्वार होऊन यू मुंबाच्या शिलेदारांनी मुंबईकर चाहत्यांच्या शुभेच्छांचा स्वीकारकेला. ३ वाजून १२ मिनिटांची चर्चगेट स्लो लोकल पकडल्यानंतर मधल्या फर्स्ट क्लास डब्याचा माहोलच बदलला. टे्रनममध्ये बसल्याबसल्या विशाल माने आणि रिशांक देवाडिगा यांनी गाणी म्हणण्यास सुरुवात केली. तर कर्णधार अनुप कुमार व संघमालक रॉनी स्क्रूवाला यांच्यासह इतर खेळाडूंनीदेखील हळूहळू विजयाचा जल्लोष करण्यास सुरुवात केली. नेहमी सेकंड क्लास गर्दीचा आणि फर्स्ट क्लास रिकामा असे चित्र पाहायला मिळते. मात्र यू मुंबाच्या प्रवासामुळे हे चित्र पालटले. इतर प्रवासीदेखील फर्स्ट क्लासमध्ये चढल्यानंतर आपण योग्य डब्यात चढलो की नाही याची खात्री करीत होते. ३ वाजून ५८ मिनिटांनी चर्चगेटला पोचल्यानंतर खेळाडूंनी ‘यू मुंबा... यू मुंबा’ असा नारा दिला. आपल्या आवडत्या खेळाडूंना विजयी चषकासह पाहण्यासाठी मुंबईकरांची मोठी गर्दी झाली. स्थानकाबाहेर ८ स्पोटर््स बाईक, ७ ओपन जिप्स, ७ कार आणि माध्यमांच्या गाड्या असा प्रचंड ताफा तयारच होता. ४ वाजून १७ मिनिटांनी ओपन जिप्समधून शुभेच्छांचा स्वीकार करीत टीम मुंबाने मरिन लाइन्समार्गे प्रेस क्लबकडे कूच केली. अंधेरीपासूनच चाहत्यांची गर्दी होती. विजयी रॅली निघालेला क्रिकेटनंतरचा पहिला खेळ कबड्डी ठरला. रॅलीतही क्रिकेटपटूंना भेटता येत नसल्याची खंत मुंबईकरांना होती. मात्र कबड्डीने ही उणीवही दूर केली आणि चाहत्यांबरोबर फोटो शूट केले. मुंबईकरांनी इतरांच्या तुलनेत कबड्डीला खूप चांगला प्रतिसाद दिला. तब्बल तीन महिन्यांपासून आम्ही एकत्र होतो, आता प्रत्येक जण वेगवेगळे होणार या गोष्टीचे वाईट वाटते. मी मूळचा केरळचा आहे, पण या तीन महिन्यांत मुंबईचा झालो आहे. विजयानंतर आईने शुभेच्छा देताना ‘सांभाळून’ खेळण्याचा सल्लाही दिला.- जीवा कुमार, यू मुंबाचा संरक्षकमी तब्बल १० वर्षांनंतर लोकल टे्रनचा प्रवास करीत आहे. आधी आमचा ठाण्यामध्ये टूथब्रशचा बिझनेस होता. त्यासाठी मी नेहमी लोकलने प्रवास करायचो. मात्र आता यू मुंबाच्या यशाच्या निमित्ताने तब्बल १० वर्षांनी पुन्हा एकदा लोकल प्रवास केला. त्यावेळच्या तुलनेत आता खूप बदल जाणवत आहे. मुंबईकरांमध्ये मिसळून या विजयाचा आनंद साजरा करण्याचे आम्ही ठरवले होते. - रॉनी स्क्रूवाला, यू मुंबा संघमालकगतवर्षी आमचे विजेतेपद थोडक्यात हुकले होते. मात्र यंदा ती कसर भरून काढली. लोकल टे्रनचा प्रवास करायला खूप मजा आली. मुंबईकरांनी खूप शुभेच्छा दिल्या. सगळे आमच्यासोबत फोटो काढण्यास उत्सुक होते. त्यांनी दिलेल्या पाठिंब्यामुळेच आम्हाला विजयी कामगिरीची प्रेरणा मिळाली.- अनुप कुमार, यू मुंबा कर्णधार
‘यू मुंबा’चा लोकल जल्लोष
By admin | Updated: August 25, 2015 03:30 IST