समीर कर्णुक, मुंबईशहरातील अन्य झोनच्या तुलनेत झोन-४ मध्ये मोठ्या प्रमाणात झोपडपट्टी परिसर आहे. त्यामुळे या ठिकाणी गुन्ह्यांचे प्रमाणदेखील जास्त आहे. या गुन्हेगारीचा बीमोड करण्यासाठी पोलीस उपायुक्त अशोक दुधे यांनी स्थानिक रहिवाशांना एकत्र केले आहे. दर आठवड्याला ते त्यांच्यासोबत बैठका घेत आहेत. रहिवाशांच्या मदतीने या परिसरातील गुन्हेगारीचे प्रमाण कमी होईल, असे मनोगत दुधे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. झोन-४ मध्ये वडाळा, अॅण्टॉप हिल, सायन, काळाचौकी आणि काही धारावीचा भागदेखील येतो. या संपूर्ण परिसरात झोपडपट्टी असल्याने या ठिकाणी घरगुती वाद, दोन गटांतील वाद, महिलांसोबत छेडछाड, घरफोडी, लूट आणि अमली पदार्थांची विक्री आणि सेवन अशा प्रकारच्या गुन्ह्यांचे प्रमाण अधिक आहे. तर गेल्या वर्षभरात या झोनमध्ये अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचारामध्येदेखील मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. या गुन्ह्यांची संख्या कमी करण्यासाठी पोलीस उपायुक्त दुधे यांनी परिसरातील सर्व रहिवाशांची आठवड्यात एकदा बैठक घेणे सुरू केले आहे. परिसरात कोणीही संशयास्पद आढळले किंवा कोणावर संशय आल्यास तत्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन करून त्याची माहिती द्यावी. तसेच अमली पदार्थांच्या सेवनामुळे कशा प्रकारे तरुण पिढी बिघडत आहे, तरुण पिढीला यापासून परावृत्त करण्यासाठीच्या उपाययोजनांवर ते सातत्याने काम करीत आहेत. रहिवाशांच्या माध्यमातूनच हे काम पुढे जाऊ शकते, असे दुधे यांचे म्हणणे आहे. झोन-४ मध्ये राहणारे नागरिक हे विविध जाती-धर्माचे असल्याने प्रत्येक सणावेळी येथील कायदा आणि सुव्यवस्था बिघडण्याची मोठी शक्यता असते. त्यामुळे पोलिसांवर नेहमीच कामाचा मोठा ताण असतो. देशातील सर्वात लोकप्रिय असलेला ‘लालबागचा राजा’ हा याच झोन अंतर्गत येतो. शिवाय देशातील सर्वात श्रीमंत गणपती असलेला माटुंग्याचा ‘जीएसबी राजा’ मंडळदेखील याच झोन अंतर्गत येते. या मंडळात मूर्तीवर मोठ्या प्रमाणात सोन्याचे दागिने असल्याने या ठिकाणी दिवस-रात्र चोख बंदोबस्त पोलिसांना ठेवावा लागतो. त्यामुळे गणेश उत्सवातील दहा दिवस सर्वच पोलीस ठाण्यांतील कर्मचारी आणि अधिकारी सतर्क राहून शहरातील कायदा व सुवस्था टिकवून ठेवतात.‘थेट मला फोन करा’झोन-४मध्ये गेल्या वर्षभरात अल्पवयीन मुला-मुलींवर आणि महिलांवर मोठ्या प्रमाणात अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे या अत्याचारांना रोखण्यासाठी त्यांनी महिला कमिट्या तयार केल्या आहेत. महिलांच्या काही तक्रारी आल्यास तत्काळ कारवाई करण्याचे आदेश त्यांनी संबंधित पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना दिले आहेत. अशोक दुधे यांनी त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व सात पोलीस ठाणे आणि २४ बीट चौकीबाहेर त्यांचा मोबाइल नंबर लिहून ठेवला आहे. त्यामुळे कोणी पोलीस अधिकारी दखल घेत नसल्यास किंवा कोणावर अन्याय होत असल्यास तत्काळ ‘मला फोन करा’, अशा सूचना त्यांनी रहिवाशांसाठी लिहून ठेवलेल्या आहेत.
गुन्हेगारीचा बीमोड करण्यासाठी स्थानिकांची मदत
By admin | Updated: November 25, 2015 02:33 IST