Join us
Daily Top 2Weekly Top 5

स्थानिक मच्छीमारांच्या सागरी खेळांवर संक्रांत!

By admin | Updated: May 29, 2015 01:35 IST

राज्यातील सागरी किनाऱ्यांवर पर्यटकांना जलपर्यटनाचा आनंद घेण्यासाठी सुरू असलेल्या सागरी खेळाच्या व्यवसायातून स्थानिक मच्छीमार हद्दीपार होण्याची भीती निर्माण झाली आहे.

चेतन ननावरे ल्ल मुंबई राज्यातील सागरी किनाऱ्यांवर पर्यटकांना जलपर्यटनाचा आनंद घेण्यासाठी सुरू असलेल्या सागरी खेळाच्या व्यवसायातून स्थानिक मच्छीमार हद्दीपार होण्याची भीती निर्माण झाली आहे. कारण सागरी खेळाच्या परवान्यासाठी मच्छीमारांनी केलेले अर्ज महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाने शासन दप्तरी गुंडाळल्याची बाब माहिती अधिकारातून उघड झाली आहे.या प्रकाराला स्वाभिमानी मच्छीमार संघटनेने विरोध केला आहे. संघटनेचे अध्यक्ष रवींद्र पांचाळ म्हणाले की, २००९ साली शासनाने सागरी खेळातून पर्यटकांसाठी जलपर्यटनाचा एक वेगळा मार्ग सुरू केला. त्यातून स्थानिक मच्छीमारांना रोजगार निर्माण व्हावा म्हणून परवाने देण्यात आले. मात्र गेल्या दोन वर्षांपासून नव्या परवान्यांना रोख लावण्यात आली आहे. माहिती अधिकारातून समोर आलेल्या वस्तुस्थितीमध्ये महाराष्ट्र जलक्रीडा धोरण २०१४ तयार केल्याचे उघड झाले. याच कारणास्तव शासन नवे परवाने देत नसल्याचेही कळाले. या नव्या नियमावलीची कोणतीही कल्पना मच्छीमार संघटनांना देण्यात आलेली नाही.याआधी शासनाने रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यासाठी एकूण ६९ परवाने वितरित केलेले आहेत. या ठिकाणी मिळणारा प्रतिसाद पाहून राज्यातील विविध मच्छीमार आणि मच्छीमार संस्थांनी परवाना मिळवण्यासाठी अर्ज केले. परवान्यासाठी आवश्यक स्थानिक ग्रामपंचायती आणि मेरिटाइम बोर्डाचे ना हरकत प्रमाणपत्रही मिळवले. मात्र नव्या धोरणाचे कारण देत आता महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाकडून सर्वच अर्ज दप्तरी दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे स्थानिक मच्छीमारांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. नव्या धोरणात निविदा मागवून सागरी खेळाचा व्यवसाय बड्या उद्योगपतींच्या घशात घालण्याचा बोर्डाचा डाव असल्याचा आरोप पांचाळ यांनी केला आहे. नवे धोरण जाहीर होईपर्यंत जुन्या धोरणाप्रमाणे शासनाने परवाने देण्याची गरज होती. मात्र गेल्या दोन वर्षांपासून शासन स्तरावर नवी नियमावली तयार करण्याचेच काम सुरू आहे. त्यामध्ये गरीब मच्छीमार आणि संघटना भरडल्या जात आहेत.कारण मासेमारीतून उदरनिर्वाह होत नसल्याने बहुतेक मच्छीमारांनी स्थानिक प्रशासनाच्या परवानगीनंतर सागरी खेळासाठी आवश्यक बोटी आणि साहित्य कर्ज काढून विकत घेतल्याचा दावाही पांचाळ यांनी केला आहे. मात्र ऐनवेळी शासनाने परवान्यासाठी केलेले अर्ज दप्तरी गुंडाळल्याने मच्छीमारांना आत्महत्या करण्याशिवाय पर्याय उरणार नाही, असेही त्यांनी सांगितले. परिणामी, नव्या नियमावलीबाबत मच्छीमार संघटनांसोबत चर्चा न केल्यास तीव्र आंदोलन उभारण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.सागरी खेळ म्हणजे काय रे भाऊ?महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाने हार्बर क्रूझिंग, तरंगते रेस्टॉरंट, वॉटर स्कूटर, हाउस बोट, जेट स्कीईंग, डिंगी स्कीईंग, स्पीड बोट, वॉटर स्कीईंग, बनाना बोट राईड, पॅरासेलिंग या १० प्रकारांचा समावेश सागरी खेळांत केला आहे.कुठे सुरू आहेत सागरी खेळ?राज्यात रायगड जिल्ह्यात वरसोली, किहीम, नागांव, अलिबाग, आक्षी-रायवाडी, पालाव-रेवदंडा, काशिद, मुरूड, दिवेआगार, श्रीवर्धन या ठिकाणी सागरी खेळांना परवाने देण्यात आले आहेत. तर रत्नागिरी जिल्ह्यातील आरेवारे, गणपतीपुळे, मुरूड, हर्णे, या सागरी किनाऱ्यांवर सागरी खेळांसाठी परवाने वितरित केले आहेत.