Join us

लोकल भाडेवाढीचे संकेत

By admin | Updated: November 28, 2014 02:24 IST

उपनगरीय रेल्वे सेवा सध्या तोटय़ात असून प्रवाशांनी सोयीसुविधा आणि अनेक प्रकल्पांसाठी तिकीट दरवाढ स्वीकारायला हवी, असे सांगत रेल्वे बोर्ड सदस्य देवी प्रसाद पांडे यांनी दरवाढीचे संकेत दिले.

मुंबई : उपनगरीय रेल्वे सेवा सध्या तोटय़ात असून प्रवाशांनी सोयीसुविधा आणि अनेक प्रकल्पांसाठी तिकीट दरवाढ स्वीकारायला हवी, असे सांगत रेल्वे बोर्ड सदस्य देवी प्रसाद पांडे यांनी दरवाढीचे संकेत दिले. मात्र ही भाडेवाढ करताना प्रवाशांकडून मते मागविली जाणार असल्याचे ते म्हणाले. दरम्यान, सातत्याने होणा:या बिघाडामुळे मध्य रेल्वे सुरळीत होण्यासाठी आणखी 15 दिवसांचा कालावधी लागेल, असेही त्यांनी सांगितले.
जून महिन्यात झालेली दरवाढ विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून अनेक लोकप्रतिनिधींनी मागे घेण्यास भाग पाडली. तसेच या दरवाढीला प्रवासी आणि रेल्वे संघटनांनीही तीव्र विरोध केला होता. त्यामुळे ही भाडेवाढ मागे घेत फक्त 14.2 टक्केच भाडेवाढ मासिक पासाच्या आणि लांब पल्ल्याच्या गाडय़ांच्या दरात केल्यामुळे रेल्वेला अपेक्षित उत्पन्न मिळाले नाही आणि त्यानंतर तोटाच झाला. त्यामुळे भाडेवाढ करण्याचा रेल्वेचा विचार असून, ही वाढ देशभरात लागू होईल. पण ती नेमकी किती असावी यासाठी प्रवाशांची मते विचारात घेतली जाणार असल्याचे पांडे यांनी सांगितले. उपनगरीय लोकलची भाडेवाढ करताना तर रेल्वे आणि मुंबई रेल्वे विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून प्रवाशांची मते जाणून घेतली जातील, असे ते म्हणाले. 
प्रवाशांना 15 दिवसांचा मनस्ताप
गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने होणा:या बिघाडामुळे मध्य रेल्वेच्या वक्तशीरपणाचा आलेख खाली आला असून, यात सुधारणा होण्यासाठी 15 दिवसांचा कालावधी लागेल, असे पांडे यांनी सांगितले. यासाठी मध्य रेल्वेकडून मोठय़ा प्रमाणात कामे हाती घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
गेल्या काही महिन्यांपासून मध्य रेल्वेच्या लोकल सेवेचा सातत्याने बोजवारा उडत आहे. याचा आढावा घेण्यासाठी रेल्वे बोर्डाचे सदस्य पांडे यांना मुंबईत पाठवले होते. त्यानुसार मध्य रेल्वेच्या कामकाजाचा आणि होणा:या बिघाडांचा आढावा त्यांनी घेतला. लोकल फे:यांमध्ये सुधारणा करण्यासाठी अॅक्शन प्लान आखण्यात आला असून, त्यासाठी मोठय़ा प्रमाणात कामे हाती घेण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली.
 
स्वयंचलित दरवाजांच्या क्षमतेवर परिणाम
स्वयंचलित दरवाजांच्या लोकलमुळे प्रवासी क्षमता कमी होण्याबरोबरच लोकल फे:यांवरही परिणाम होण्याची भीती या वेळी व्यक्त करण्यात आली. सध्या स्थानकांवर लोकल गाडय़ांना 30 सेकंदांचा थांबा असून, तो या दरवाजांमुळे वाढण्याची शक्यता आहे आणि त्याचा फटका लोकल 
सेवेला बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेक तांत्रिक बाबी तपासून बघत असल्याचे पांडे म्हणाले.
 
एक वर्षापेक्षा अधिक कालावधी होऊनही पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात आलेल्या दोन बम्बार्डियर लोकल गाडय़ा सुरू करण्यास मुहूर्त मिळत नसल्याचे विचारताच त्यांत काही तांत्रिक अडचणी होत्या. त्यात सुधारणा केली जात असून, या लोकल पुढील एक महिन्यात येण्याची शक्यता असल्याची माहिती दिली. 
 
मोबाइलवरही मिळणार तिकीट : लोकल प्रवाशांना आता मोबाइलवरही तिकीट देण्याची व्यवस्था रेल्वे बोर्डाकडून केली जाणार आहे. तिकीट काढण्यासाठी खिडक्या आणि एटीव्हीएम मशीनसमोर असलेल्या लांबच लांब रांगांतून सुटका करण्यासाठी प्रवाशांना मोबाइल तिकीट सेवा येत्या डिसेंबर 2014र्पयत देण्याचा प्रयत्न असल्याचे पांडे यांनी सांगितले.