बोर्ली-पंचतन : रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील विकसित क्षेत्र असलेले दिघी पोर्ट यामुळे म्हसळा तालुक्यातील रोहिणी-तुरुंबाडी गावाजवळ काही कंपनी दाखल झाल्या आहेत आणि त्यांनी आपला व्यवसाय स्थिरस्थावर करण्याकडे कल वाढवला आहे. त्यामुळे स्थानिक तरुणांना रोजगार मिळण्याची शक्यता वाढली आहे. श्रीवर्धन व म्हसळा तालुक्यातील सुमारे दीड हजार बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे स्थानिकांची रोजगाराची वणवण थांबणार असल्याचे चित्र आहे. परंतु दिघी पोर्टसोबत इतर येत असलेले प्रकल्पांचे कामही कूर्मगतीने सुरू असल्याने प्रत्यक्षात रोजगार केव्हा उपलब्ध होवू शकतील, याबाबत मात्र साशंकता आहे. म्हसळा तालुक्यातील वारळ, तुरुंबाडी, रोहिणी त्याचबरोबर श्रीवर्धन तालुक्यातील दिघी, हरवित व इतर आसपासच्या गावांमध्ये दिघी पोर्टमुळे विविध कंपनी, प्रकल्प, छोटे मोठे व्यवसाय यांचे बस्तान बसणार आहे. या भागातील जमिनीला सध्या जबरदस्त भाव आहे. भविष्यात येवू घातलेले प्रकल्प यामुळे जमिनीच्या भावांची खूपच चढ्या किमतीने खरेदी-विक्री सुरू आहे. गेली ३-४ वर्षे सदरचे काम सुरू आहे. परंतु हे काम अत्यंत कूर्म गतीने सुरू आहे. परंतु अशा प्रकल्पामुळे स्थानिकांना चांगला रोजगार उपलब्ध होणार आहे. या प्रकल्पाच्या पूर्णतेनंतर वेल्डर, फिटर, टिगर, हेल्पर, गॅस कटर, ग्रार्इंडर, कार्यालयाच्या कामासाठी पदवीधर, संगणक तज्ज्ञ, सुपरवायझर, आवश्यक मेकॅनिक इंजिनिअर अशा अनेक रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. कंपनीने देखील स्थानिक तरुणांना रोजगार उपलब्ध होईल असे अभिवचन स्थानिकांना दिले असल्याने जवळपास दीड हजार विविध पदांसाठी भरती रोजगाराची होवू शकणार आहे. इतरही अनेक कंपन्या यासाठी कार्यभार थाटणार असल्याने येवू घातलेल्या प्रकल्पांमुळे श्रीवर्धन, म्हसळा, मुरुड तालुक्यातील बेरोजगारांची रोजगारासाठीची वणवण नक्कीच थांबेल. त्याचप्रमाणे स्थानिक शासकीय कार्यालयाचेही विविध करातून उत्पन्न, स्थानिक ग्रामस्थांनाही रोजगार उपलब्ध होणार असल्याचे बोलले जात आहे. (वार्ताहर)
स्थानिकांच्या रोजगाराची वणवण थांबणार !
By admin | Updated: August 26, 2014 23:40 IST