Join us

लोकल डब्यात भोंदू‘बाबां’ची पोस्टरबाजी जोरात

By admin | Updated: April 2, 2015 02:41 IST

‘तुम्हाला नैराश्य आले आहे का, तुम्हाला प्रमोशन हवे आहे का’ असे प्रश्न उपस्थित करीत तुमचे सगळे प्रश्न सोडविण्याचे खात्रीने सांगणाऱ्या बाबांविरोधात मध्य

मुंबई : ‘तुम्हाला नैराश्य आले आहे का, तुम्हाला प्रमोशन हवे आहे का’ असे प्रश्न उपस्थित करीत तुमचे सगळे प्रश्न सोडविण्याचे खात्रीने सांगणाऱ्या बाबांविरोधात मध्य रेल्वेने कठोर पाऊल उचलण्यास सुरुवात केली आहे. बाबांकडून लोकलच्या डब्यात पोस्टर्सबाजी करून अस्वच्छता पसरविली जात असल्याने त्यांच्याविरोधात कारवाई केली जात असून, एक वर्ष दोन महिन्यांत ४१९ केसेस करण्यात आल्याचे सांगण्यात आले. या आकडेवारीतून बाबागिरी किती वाढली आहे, हेच दिसून येते.भोंदूबाबांमुळे अनेक निष्पाप लोकांचे बळी जात असून, त्यांना आळा घालण्यास राज्य शासनाला अपयशच येत आहे. तर पोलीसही हतबल दिसत आहेत. या भोंदूबाबांकडून फसवणूक होतानाच नरबळी, आर्थिक फसवणूक तसेच बलात्काराच्याही घटना घडल्या आहेत, तरीही त्यांच्याविरोधात कठोर कारवाई होताना दिसत नाही. या भोंदूबाबांची ‘बाबू’गिरी तर रेल्वेतही सर्रासपणे वाढलेली दिसते. नैराश्य दूर करावे, आर्थिक भरभराट व्हावी, प्रेमप्रकरणात आणि कार्यालयातील कामात यश मिळावे, यासह अनेक कटकटीतून सुटका करण्याचे आश्वासन हे बाबा देत आपली जाहिरात लोकलच्या डब्यातून करीत आहेत. ही जाहिरात करण्यासाठी डब्यातील आतील आणि बाहेरील बाजूने पोस्टर्सबाजी केली जाते. या पोस्टर्सबाजीमुळे लोकलमध्ये अस्वच्छता पसरतानाच त्याचे देखणेपणही निघून जात आहे. अशा बाबांकडून करण्यात येणाऱ्या पोस्टर्सबाजीविरोधात मध्य रेल्वेच्या आरपीएफकडून कारवाई केली जात आहे. मात्र ही कारवाई पाहता ती प्रचंड असल्याचेच दिसते. २0१४ मध्ये अशाप्रकारे पोस्टर्सबाजी करणाऱ्या ३७७ जणांविरोधात कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून, यातून २ लाख ९४ हजार २५0 दंड वसूल करण्यात आला आहे. २0१५ च्या पहिल्या दोन महिन्यांतही ४२ केसेस दाखल झाल्याचे सांगण्यात आले. त्यांच्यावरही केलेल्या दंडात्मक कारवाईतून ३१ हजार रूपये दंड वसूल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)