Join us
Daily Top 2Weekly Top 5

मानोरी-गोराई चौपाटीच्या सफाईसाठी नऊ कोटींचा भार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:32 IST

मुंबई : मनोरी-गोराई समुद्र किनारपट्टीच्या साफसफाईचे सहा वर्षांचे कंत्राट देण्यात येणार आहे. तसेच चौपट्यांवर रात्रीच्या वेळी दिसतील असे कचऱ्याचे ...

मुंबई : मनोरी-गोराई समुद्र किनारपट्टीच्या साफसफाईचे सहा वर्षांचे कंत्राट देण्यात येणार आहे. तसेच चौपट्यांवर रात्रीच्या वेळी दिसतील असे कचऱ्याचे डब्बेही बसविण्यात येणार आहेत. मात्र सफाईच्या नवीन कंत्राटाचे दर ३८ ते ४८ हजार रुपये प्रतिदिन असा निश्चित करण्यात आला आहे. वाळूतला कचरा उचलणाऱ्या स्किड स्टीअर लोडर यंत्राचा समावेश करण्याची अटही यासाठी घालण्यात आली आहे. त्यामुळे आर्थिक स्थिती नाजूक असतानाही पर्यटकांची संख्या कमी असलेल्या या चौपाटीच्या सफाईसाठी महापालिका नऊ कोटी रुपये खर्च करणार आहे.

मुंबईतील गिरगाव, दादर, जुहू या प्रमुख चौपाट्यांवर दररोज मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात. त्यामुळे या चौपाट्यांची साफसफाई अत्याधुनिक यंत्राच्या माध्यमातून केली जाते. मात्र आता पर्यटकांचे रोजचे प्रमाण कमी असलेल्या मनोरी व गोराई चौपाटीच्या स्वच्छतेसाठी राम इंजिनिअरिंग ॲण्ड कन्स्ट्रक्शन या कंपनीला सहा वर्षांसाठी ९.९६ कोटी रुपयांचे कंत्राट देण्यात येणार आहे. या सहा वर्षांतील पहिल्या वर्षी प्रतिदिन ३८ हजार ८५९ रुपये एवढा दर आकारला जाणार आहे. तर पुढील प्रत्येक वर्षी पाच टक्के एवढी रक्कम वाढविण्यात येणार आहे.

सहाव्या वर्षी ही वाढ २५ टक्के एवढी होऊन प्रतिदिन ४८ हजार ५७३ रुपये दर होणार आहे. सध्याचे कंत्राट १७ जानेवारी २०२१ रोजी संपुष्टात येणार आहे. मात्र नवीन निविदेत स्किड स्टीअर लोडर यंत्राचा समावेश करण्यात आला. या यंत्रासोबत बीच क्लिनिंग, रोड स्वीपींग, रॉक बकेट, ग्रॅपल बकेट अटॅच असतील. त्यामुळे हा दर दुप्पट वाढला असल्याचा दाव प्रशासनाने केला आहे. या समुद्र किनाऱ्याची साफसफाई २४ तास यंत्र व मनुष्यबळाचा वापर करीत केली जाणार आहे. तसेच ठेकेदारांकडून पुरवण्यात येणाऱ्या मनुष्यबळावर देखरेख ठेवण्याकरता कामगारांना ॲड्रॉइड मनगटी घड्याळ दिले जाणार आहे.

रात्रीही दिसणार कचऱ्याचे डब्बे...

दोन्ही चौपाट्यांची एकूण लांबी सात किलोमीटर एवढी आहे. मनोरीची रुंदी ६० मीटर आणि गोराईची रुंदी १२० मीटर एवढी आहे. या दोन्ही चौपाट्यांवर रात्री सहा ते सातनंतर पर्यटकांची संख्या कमी असून रात्री कोणी फिरकत नाहीत. रात्रीच्या वेळी चौपाटीवर कचरा फेकण्यासाठी बसवण्यात येणाऱ्या पेट्या लक्षात याव्यात, यासाठी सौर ऊर्जेने परावर्तित होणारी झाकणे असलेली २४० लीटर क्षमतेच्या व्हील बिन्स ठेवण्यात येणार आहे.