Join us  

२२ वर्षीय तरुणावर यकृत प्रत्यारोपण, १७ वर्षे होता 'त्रास'; आईने पन्नास टक्के यकृत केले दान

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2020 9:22 AM

प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यकृत प्रत्यारोपण विभागाचे प्रमुख आणि वरिष्ठ सल्लागार डॉ. अंकुर गर्ग यांनी आणि त्यांच्या पथकाने केली. रोशन हा पाच वर्षांचा असल्यापासूनच यकृताच्या तीव्र रोगाने ग्रस्त होता. (Liver transplant)

मुंबई :मुंबईतील विलेपार्ले येथील खासगी रुग्णालयात कोविडमधून सावरलेल्या २२ वर्षांच्या तरुणावर यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया नुकतीच करण्यात आली. मुंबईच्या रोशन गुरवला गेल्या १७ वर्षांपासून यकृताचा तीव्र स्वरूपाचा आजार होता. त्याला त्याच्या आईने स्वत:च्या यकृतापैकी ५० टक्के भाग दान केला अन् रोशनला नवीन आयुष्य मिळाले.

प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यकृत प्रत्यारोपण विभागाचे प्रमुख आणि वरिष्ठ सल्लागार डॉ. अंकुर गर्ग यांनी आणि त्यांच्या पथकाने केली. रोशन हा पाच वर्षांचा असल्यापासूनच यकृताच्या तीव्र रोगाने ग्रस्त होता. त्याच्या ‘एमईएलडी’चा गुणांक (मॉडेल फॉर एन्ड-स्टेज लिव्हर डिसीज) हा ३५ पेक्षा जास्त होता. रोशनच्या या परिस्थितीमुळे, त्याच्यावर उपचार करण्यास उशीर झाला असता, तर त्याच्या यकृताची कार्ये अजून बिघडली असती आणि त्याच्या आयुष्याला धोका निर्माण झाला असता. एखाद्या रुग्णाची मूत्रपिंडे निकामी झाल्यास डायलिसिससारखे उपचारात्मक पर्याय उपलब्ध आहेत. यकृताच्या आजारात तसे  शक्य नाही. येथे शेवटच्या टप्प्यात असलेल्या यकृताच्या आजारासाठी ते यकृतच बदलणे हा एकमेव उपाय होता. तसा सल्ला रोशनच्या कुटुंबाला दिला.

रुग्णाच्या आईचे यकृत रुग्णाच्या शरीराला जुळणारे निघाले. तिच्या यकृताचा काही भाग दान करणे वैद्यकीयदृष्ट्या शक्य होते असे  डॉ. गर्ग यांनी सांगितले. शिवाय, प्रत्यारोपणापूर्वीच्या तपासणीदरम्यान रोशनला ‘कोविड-१९’ची लागण झाली असल्याचे आढळून आले. त्यामुळे प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियेत मोठा अडथळा निर्माण झाला. अवयव प्रत्यारोपणाच्या नियमानुसार शस्त्रक्रिया सहा आठवडे लांबवण्यात आली. रोशनने ‘कोविड’च्या संसर्गाचा सामना केला, दोन तीव्र स्वरूपाचे आजार एकत्र असतानाही तो आठवड्याभरात बरा झाला, अशी माहिती ‘एचआयपीबी सर्जरी’ आणि यकृत प्रत्यारोपण सल्लागार डॉ. वैभव कुमार दिली. शस्त्रक्रिया झाल्यावर कोणताही अनुचित प्रसंग न घडता, दोघांची प्रकृती सुधारली व दोन आठवड्यांनी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. 

एखाद्या रुग्णाची मूत्रपिंडे निकामी झाल्यास डायलिसिससारखे उपचारात्मक पर्याय उपलब्ध आहेत. यकृताच्या आजारात तसे  शक्य नाही. यकृतच बदलणे हा एकमेव उपाय होता. 

टॅग्स :अवयव दानडॉक्टरहॉस्पिटलमुंबई