Join us

महिलेच्या अवयवदानामुळे दोघांना जीवनदान; हृदय मुलुंड रुग्णालयात, तर यकृत ठाणे येथील रुग्णाला दान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2018 03:07 IST

एका ४० वर्षीय महिलेच्या अवयवदानामुळे दोघांना जीवनदान मिळाले आहे. मुंबईतील हे २७वे अवयवदान असल्याची माहिती विभागीय प्रत्यारोपण समितीने दिली. कांता अशोक गमरे असे त्या महिलेचे नाव असून, तिच्या कुटुंबीयांच्या निर्णयामुळे हे अवयवदान पार पडले.

मुंबई : एका ४० वर्षीय महिलेच्या अवयवदानामुळे दोघांना जीवनदान मिळाले आहे. मुंबईतील हे २७वे अवयवदान असल्याची माहिती विभागीय प्रत्यारोपण समितीने दिली. कांता अशोक गमरे असे त्या महिलेचे नाव असून, तिच्या कुटुंबीयांच्या निर्णयामुळे हे अवयवदान पार पडले.कांता मगरे यांनी हृदय आणि यकृत दान केले आहे. रुग्णालय प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, या महिलेचे यकृत काश्मीरहून उपचारांसाठी आलेल्या ६५ वर्षीय व्यक्तीला देण्यात आले. त्यांच्यावर सध्या ठाणे येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रस्ता ओलांडताना टेम्पोच्या धडकेने कांता यांचा अपघात झाला होता. त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर चार दिवस उपचार सुरू होते, अखेरीस त्यांना ब्रेनडेड घोषित करण्यात आले. त्यानंतर कुटुंबीयांनी त्यांचे अवयवदान करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती त्यांचे नातेवाईक नितीन पोटफोडे यांनी दिली. याविषयी, विभागीय प्रत्यारोपण समितीचे समन्वयक अनिरुद्ध कुलकर्णी यांनी सांगितले, समितीच्या नियमानुसार मगरे यांचे हृदय मुलुंड येथील रुग्णालयात ठेवण्यात आले, तर यकृत ठाणे येथील एका रुग्णाला दान करण्यात आले.२१ वर्षीय निहारचे ‘नेत्रदान’; अभिनयाचे स्वप्न मात्र अपुरेभांडुप येथे झालेल्या भीषण अपघातात निहार गोळे (२१) याचे दोन दिवसांपूर्वी निधन झाले. मात्र, पोटच्या मुलाच्या निधनाचे दु:ख बाजूला सारून कुटुंबीयांनी त्याचे दोन्ही डोळे दान करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. ठाण्यातील श्रीरंग सोसायटीत निहार प्रमोद गोळे हा तरुण राहायचा. जोशी बेडेकर महाविद्यालयात मास मीडियाचे शिक्षण पूर्ण केलेल्या निहारला अभिनयाचे प्रचंड वेड होते, येत्या काहीच दिवसांत तो सचिन पिळगावकर यांच्यासह मराठी सिनेमात काम करणार होता.निहारचे वडील एअर इंडियातून निवृत्त झाले होते. तर, आई ठाणे महापालिकेत कार्यरत असून दोन महिन्यांनी निवृत्त होणार आहेत. शनिवारी पहाटे पार्टीहून घरी परतत असताना भांडुप उड्डाणपुलावर झालेल्या भीषण अपघातानंतर निहार आणि त्याचा मित्र यश चौगुले यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच निहारचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. त्याच्या कुटुंबीयांच्या निर्णयानुसार निहारचे डोळे अकरा व सात वर्षीय अशा दोन लहानग्या मुलींना देण्यात आले.

टॅग्स :मुंबई