Join us

आठवडाभरापासून वीजेचा खेळखंडोबा

By admin | Updated: November 20, 2014 23:19 IST

आठवडाभरापासून डोंबिवलीत विजेचा खेळखंडोबा सुरू असल्याने नागरिक त्रस्त आहेत. पूर्व-पश्चिमेकडील काही भागांतच सातत्याने वीजपुरवठा खंडित होत असल्याने पंचाईत होत आहे

डोंबिवली : आठवडाभरापासून डोंबिवलीत विजेचा खेळखंडोबा सुरू असल्याने नागरिक त्रस्त आहेत. पूर्व-पश्चिमेकडील काही भागांतच सातत्याने वीजपुरवठा खंडित होत असल्याने पंचाईत होत आहे. संध्याकाळ आणि सकाळच्या पहिल्या सत्रात ही समस्या उद्भवत असल्याचे सांगण्यात येत आहे. यासंदर्भात ग्राहकांनी संबंधित कनिष्ठ अभियंत्यांना संपर्क साधून नेमकी समस्या काय आहे, हे सांगण्यासाठी विचारणा केल्यास त्यांच्याकडून मात्र समस्या समजून घेण्यापेक्षा, आम्हाला काम करू द्या, आमचे थोडे प्रॉब्लेम आहेत, अशा आवाजी भाषेत उत्तरे मिळत असल्यानेही ग्राहक संतापले आहेत.लोकमतला मिळालेल्या माहितीनुसार पूर्वेकडील फडके पदपथावर कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या माध्यमातून सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. यामुळे अनेकदा या ठिकाणी जेसीबीसह अन्य मोठी यंत्रे आणून रस्ते खोदण्यात येतात. त्या कामातच चार दिवसांपूर्वी महावितरणच्या केबलला फटका लागल्यामुळे संध्याकाळच्या वेळेत तब्बल चार तास वीजपुरवठा खंडित झाला होता. अनेक सोसायट्यांमधील रहिवाशांसह दुकानदारांना याचा त्रास झाला. याखेरीज, कधी ट्रीपरची समस्या तर कधी ट्रान्सफॉर्मरची समस्या, केबलमध्ये तांत्रिक बिघाड आदी कारणे महावितरणकडून देण्यात आली. त्यामुळे गेला आठवडाभर विजेच्या लपंडावामुळे ग्राहक कंटाळले आहेत. एरव्ही, सबंध महाराष्ट्रात भारनियमन होत असताना डोंबिवली मात्र त्यातून मुक्त असते़ असे असतानाही आता तर काहीही कारणे नसतानाही अशा समस्या उद्भवत असल्याने ग्राहकांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहे. गुरुवारीही सकाळच्या वेळेतच नालंदा येथील महावितरण मुख्य वाहिनीत तांत्रिक समस्या झाल्याने काही वेळेसाठी वीजपुरवठा खंडित झाल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले. अशा विविध कारणांमुळे डोंबिवलीकर विजेच्या समस्येने हैराण झाले असून महावितरण अधिकाऱ्यांच्या आवाजी उत्तराने नेमकी कोणाकडे दाद मागावी, या बुचकळ्यात ते पडले आहेत. (वार्ताहर)