Join us  

मुंबई, ठाणे, नवी मुंबई परिसरात पावसाच्या हलक्या सरी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 06, 2019 1:30 AM

मुंबई, कोकण आणि गोव्यात गुरुवारी पाऊस पडेल तसेच मुंबईचे वातावरण ढगाळ राहील, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली होती.

मुंबई : मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई परिसरात गुरुवारी पहाटे पावसाचा शिडकावा झाला. दुसरीकडे येत्या दोन ते तीन दिवसांत राज्यात गारठा वाढणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तविला.मुंबई, कोकण आणि गोव्यात गुरुवारी पाऊस पडेल तसेच मुंबईचे वातावरण ढगाळ राहील, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली होती. ती खरी ठरली. मुंबईसह ठाणे आणि नवी मुंबई परिसरातही गुरुवारी पहाटे पावसाने हजेरी लावली. दरम्यान, हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवार, ६ डिसेंबर रोजी आकाश सामान्यत: ढगाळ राहण्याची शक्यता असून हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. शनिवार, ७ डिसेंबर रोजीही मुंबई शहर, उपनगरातील आकाश अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे.उत्तर भारतातील अनेक शहरांमधील किमान तापमान ६ अंशाखाली उतरले असून आता महाराष्ट्रातील गारठाही वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला. पंजाब, हरयाणाबरोबरच उत्तर-पश्चिम भारत, मध्य भारत आणि पूर्वेकडील राज्यांमध्ये थंड वारे वाहणे सुरू झाले आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत राज्यातही गारठा वाढण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, गुरुवार, ५ डिसेंबर रोजी राज्यात सर्वांत कमी किमान तापमान गोंदिया येथे १२ अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले.साधारणत: डिसेंबर महिन्यात कोरड्या राहणाऱ्या मुंबईतही आश्चर्यकारकपणे पावसाची नोंद होत आहे. मागील २४ तासांत १ मिमी पाऊस पडल्यामुळे शहरात डिसेंबरच्या सरासरी ०.२ मिमी पावसाच्या आकड्याला पार केले आहे. हा पाऊस मासिक सरासरीपेक्षा पाच पट जास्त आहे.डिसेंबर महिन्यात पाऊस ही दुर्मीळ घटनाडिसेंबर महिन्यात मुंबईत पाऊस ही दुर्मीळ घटना आहे. गेल्या दशकात, जवळपास तीन वेळा असे घडले होते, ज्यात शहरात अवकाळी पाऊस पडला होता. डिसेंबर २००९ मध्ये तुरळक हलक्या सरी नोंदविल्या गेल्या. डिसेंबर २०१४ मध्ये १.५ मिमी पाऊस पडला तर ६ डिसेंबर २०१७ रोजी सर्व विक्रम मोडत शहरात ५३.८ मिमी इतका जोरदार पाऊस पडला होता.ढगाळ वातावरण निवळायला लागेलढगाळ वातावरण हे शुक्रवारपासून निवळायला लागेल. भारतापासून चक्रीवादळ दूर जात आहे. त्यामुळे आता चक्रीवादळाचा परिणाम हा महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर होणार नाही. किनारपट्टीच्या जवळच्या भागामध्ये वादळाची तीव्रता कमी झाल्यामुळे गुरुवारी थोड्या प्रमाणात पावसाचा शिडकावा झाला. आता हा प्रभाव कमी झाला असून आकाश निरभ्र राहील.- कृष्णानंद होसाळीकर, उपमहासंचालक, मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र विभाग

टॅग्स :मुंबई