मुंबई : महालक्ष्मी येथील टाटा पॉवरच्या विद्युत यंत्रणेत झालेल्या बिघाडामुळे प्रभादेवी, वरळी, कंबाला हिल, वरळी डेअरी येथील बेस्टच्या वीज ग्राहकांचा वीजपुरवठा शनिवारी सायंकाळी ७ वाजता खंडित झाला होता. सायंकाळी ७ वाजता खंडित झालेला वीजपुरवठा रात्रीचे साडेनऊ वाजले, तरी पूर्ववत होत नव्हता. परिणामी, पावसाची रिपरिप, त्यात खंडित झालेल्या वीजपुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त झाले होते.खंडित विजेची माहिती बेस्टकडून टाटाला तत्काळ देण्यात आली. एकूण १४ ट्रान्सफॉर्मरमध्ये झालेल्या बिघाडामुळे एवढ्या मोठ्या परिसरातील वीजपुरवठा खंडिीत झाला होता. येथील रुग्णालयांना याचा फटका बसू नये, म्हणून अभियंत्यांकडून तत्काळ काम हाती घेण्यात आले होते. शिवाय अर्धा ते तासाभरात वीजपुरवठा पुर्ववत होईल, असेही सांगण्यात येत होते. प्रत्यक्षात मात्र, दोनएक तासांहून अधिक काळ वीजपुरवठा खंडित होता. दरम्यान, येथील यंत्रणेतील बिघाड दुरुस्त केल्यानंतर रात्री साडेनऊच्या नंतर वीजपुरवठा सुरळीत होत असल्याची माहिती बेस्टकडून प्रसारमाध्यमांना देण्यात आली.
दक्षिण-मध्य मुंबईत बत्ती गुल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2018 06:03 IST