Join us  

‘गेट वे ऑफ इंडिया’वर ‘लाइट अँड साउंड शो’; ‘मन की बात’ संकल्पनेवर कार्यक्रम

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2023 12:01 PM

‘मन की बात’मधील संकल्पनांवर आधारित देशातील १२ नामवंत चित्रकार आणि कलावंतांच्या कलाकृतींचे प्रदर्शन नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट्स येथे भरविण्यात येणार आहे

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई नवी दिल्ली : मुंबईत गेट वे ऑफ इंडिया येथे शनिवारी सायंकाळी केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’मधील संकल्पनेवर आधारित ‘लाइट अँड साउंड शो’ साकारण्यात येणार आहे.

रविवारी, ३० एप्रिल रोजी आकाशवाणीवरून ‘मन की बात’च्या शंभराव्या प्रसारणाच्या पूर्वसंध्येला सांस्कृतिक मंत्रालय देशातील १३ ऐतिहासिक वास्तुंपाशी २९ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजेपासून स्वच्छता, महिला सक्षमीकरण, मुलांचे संगोपन, संस्कृती, शिक्षण, पर्यावरण या संकल्पनांवर ‘लाइट अँड साउंड शो’चे आयोजन करणार आहे. गेट वे ऑफ इंडिया व्यतिरिक्त लाल किल्ला, ग्वाल्हेर किल्ला, सूर्य मंदिर, गोवळकोंडा किल्ला, वेल्लोर किल्ला, नवरत्नगढ, रामनगर पॅलेस, रेसिडेन्सी बिल्डिंग, सूर्यमंदिर (अहमदाबाद) रामगढ किल्ला, चित्तोडगढ किल्ला आणि दिल्लीतील प्रधानमंत्री संग्रहालयात ‘लाइट अँड साउंड शो’चे आयोजन करण्यात येईल. पंतप्रधानांनी उल्लेख केलेल्या लोकांचाही या कार्यक्रमात सहभाग असेल. सांस्कृतिक मंत्रालयाचे सचिव गोविंद मोहन यांनी ही माहिती दिली.  

‘मन की बात’मधील संकल्पनांवर आधारित देशातील १२ नामवंत चित्रकार आणि कलावंतांच्या कलाकृतींचे प्रदर्शन नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट्स येथे भरविण्यात येणार आहे. सांस्कृतिक मंत्रालयाने अमर चित्रकथा कॉमिक्सच्या माध्यमातून ‘मन की बात’मध्ये उल्लेख केलेल्या नायकांची कामगिरी दर महिन्याला बारा अंकांमध्ये कथा स्वरूपात प्रकाशित करण्याचे ठरविले आहे.

टॅग्स :मुंबईमन की बात