Join us  

मुंबईत बहुमजली इमारतींमध्ये आता लिफ्ट थेट गच्चीपर्यंत; ज्येष्ठ नागरिक, दिव्यांगांना दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2017 8:02 PM

 मुंबईत बहुमजली इमारतींमध्ये केवळ शेवटच्या मजल्यांपर्यंत लिफ्टची सेवा असते. त्यामुळे सर्वसामान्य रहिवाशी, दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांनाही गच्चीवर जाण्यासाठी शिड्यांचा आधार घ्यावा लागत आहे.

ठळक मुद्दे गच्चीपर्यंत लिफ्टची व्यवस्था करण्याची मागणी प्रशासनाने स्वीकारली संबंधित नियमांनुसार कार्यवाही होणार विरंगुळ्याचा नवीन मार्ग खुला होणार

मुंबई : मुंबईत बहुमजली इमारतींमध्ये केवळ शेवटच्या मजल्यांपर्यंत लिफ्टची सेवा असते. त्यामुळे सर्वसामान्य रहिवाशी, दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांनाही गच्चीवर जाण्यासाठी शिड्यांचा आधार घ्यावा लागत आहे. ही गैरसोय दूर करण्यासाठी गच्चीपर्यंत लिफ्टची व्यवस्था करण्याची मागणी अखेर महापालिका प्रशासनाने स्वीकारली आहे. याबाबत विकास नियोजन खात्याने तयार केलेल्या धोरणाला आयुक्त अजोय मेहता यांनी आज मंजुरी दिली.महापालिकेच्या सध्याच्या नियमांनुसार इमारतीच्या गच्चीपर्यंत लिफ्ट नेण्याबाबत स्पष्ट तरतूद नव्हती. गच्चीपर्यंत लिफ्ट जात नसल्याने ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्ती यांना गच्चीवर जाण्यास मयार्दा येत होत्या. याची दखल घेऊन गच्चीपर्यंत लिफ्ट नेण्याबाबत धोरण तयार करण्याचे आदेश आयुक्त अजोय मेहता यांनी विकास नियोजन खात्याला दिले होते. त्यानुसार तयार करण्यात आलेल्या प्रस्तावाला आयुक्तांनी आज प्रशासकीय मंजुरी दिली.गच्चीपर्यंत लिफ्ट नेण्यासाठी आवश्यक बांधकाम हे 'चटई क्षेत्र मुक्त' असणार आहे. महापालिकेच्या नियमांनुसार संबंधित अर्जदारास प्रिमियम जमा करावा लागणार आहे. मात्र जुन्या इमारतीच्या गच्चीपर्यंत 'लिफ्ट' नेण्यासाठी इमारतीच्या बांधकाम स्थैर्यतेची तपासणी करणे बंधनकारक असणार आहे. तसेच महापालिकेची परवानगी मिळाल्यानंतर लिफ्ट उभारणी करताना नियमांचे पालन व सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य ती खबरदारी घेणे ही संबंधित सोसायटीची जबाबदारी असेल, अशी माहिती विकास नियोजन खात्याचे प्रमुख अभियंता संजय दराडे यांनी दिली.- गच्चीपर्यंत लिफ्टची सोय झाल्यास ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांना दिलासा मिळणार आहे. शिड्या चढणे शक्य नसल्याने गच्चीवर मोकळी हवा, फेरफटक्यापासून वंचित राहणा-या वृद्ध व दिव्यागांसाठी विरंगुळ्याचा नवीन मार्ग खुला होणार आहे.- विमान वाहतुकीमुळे इमारतींच्या उंचीवर बंधने असणा-या भागात संबंधित नियमांनुसार कार्यवाही होणार आहे.- जुन्या इमारतीच्या गच्चीपर्यंत 'लिफ्ट' नेण्यासाठी इमारतीच्या बांधकाम स्थैर्यतेची तपासणी करणे बंधनकारक असणार आहे.- लिफ्ट उभारणी करताना व केल्यानंतर आवश्यक नियमांचे पालन व सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य ती खबरदारी घेणे ही संबंधित सोसायटीची जबाबदारी असणार आहे.

 

टॅग्स :मुंबई