मुंबई : लिफ्ट अपघातात कोवळ्या वयातील मुलांच्या डोक्यावरून मातृछत्र हरपल्याने व पतीला पत्नीच्या सहवासापासून वंचित राहावे लागल्याने अतिरिक्त मुंबई उपनगर जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने संबंधित विकासक, वास्तुविशारद, सोसायटीचे अध्यक्ष आणि उद्वाहक बसविणाऱ्याला १५ लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याचा आदेश दिला.कांदिवली येथे आकुर्ली गोल्डन पॅलेस को-आॅप. हाउसिंग सोसायटीत राहणाºया सुमन मदने यांचा लिफ्ट अपघातात २५ जून २००३ रोजी मृत्यू झाला. विकासक, उद्वाहक बसविणारे, वास्तुविशारद आणि सोसायटी पदाधिकाºयांच्या निष्काळजीपणामुळे आपल्या पत्नीचा व आपल्या मुलांच्या आईचा मृत्यू झाला. त्याचा मोबदला मिळावा यासाठी सुमन मदने यांचे पती धर्मा मदने यांनी जिल्हा ग्राहक मंचात धाव घेतली.तक्रारीनुसार, २५ जून २००३ रोजी सुमन लिफ्टमध्ये होत्या. लिफ्ट व्यवस्थित नसल्याने ती एकदम वरून खाली कोसळली. या अपघातात सुमन यांच्या डोक्याला मार बसला. त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.सर्व प्रतिवाद्यांनी बेजबाबदारपणे काम केले. त्यांनी आपली जबाबदारी नीट पार पाडली नाही. लिफ्ट वापरायची नव्हती तर तसा फलक लावण्यात आला नाही, असे तक्रारीत म्हटले होते.मात्र सर्व प्रतिवाद्यांनी त्यांच्यावरील आरोप फेटाळले. सुमन यांना लिफ्ट नीट चालत नाही, हे माहीत असूनही त्यांनी लिफ्टच्या बाहेर डोके का काढले? त्यामुळे या अपघाताला त्याच जबाबदार आहेत, असा युक्तिवाद प्रतिवाद्यांच्या वकिलांनी केला.न्यायालयाने त्यांचा युक्तिवाद फेटाळताना म्हटले की, सुमन मदने याच अपघातास जबाबदार आहेत, असे गृहीत धरले तरी सर्व प्रतिवाद्यांवर असलेली जबाबदारी आणि विशेष काळजी टाळता येणार नाही. कागदपत्रांवरून स्पष्ट होते की, त्या लिफ्टचा वापर सोसायटीचेसभासद करत होते. लिफ्टच्या वापरासाठी परवानगी घेण्यात आली नव्हती. तसेच इमारतीचा भोगवटाव पूर्णत्वाचा दाखला न घेतालिफ्टचा वापर करण्यात आला. प्रतिवाद्यांनी वैयक्तिक अथवा सयुक्तिकरीत्या जी सेवा देण्याची जबाबदारी होती ती त्यांनी नीट पार पाडलेली नाही व सर्वांनी व्यापारी प्रथेचा अवलंब केला.तक्रारीचा खर्च म्हणून दहा हजार रुपयेसुमन यांच्या मृत्यूच्या नुकसानीसाठी ५ लाख रुपये, पतीला त्याच्या पत्नीच्या सहवासापासून वंचित राहावे लागले यासाठी ५ लाख रुपये आणि कोवळ्या वयातील मुलांचे मातृछत्र हरविल्याने सर्व प्रतिवाद्यांनी वैयक्तिक किंवा सयुक्तिकरीत्या एकूण १५ लाख रुपये नुकसानभरपाई द्यावी, असा आदेश ग्राहक मंचाने दिला. तसेच तक्रारीचा खर्च म्हणून १० हजार रुपये द्यावेत, असेही निर्देश मंचाने दिले.
लिफ्ट अपघात : मातृछत्र हरपल्याने मुलांना १५ लाख रुपये नुकसानभरपाई
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2018 4:39 AM