Join us  

प्रदूषणामुळे जीवसृष्टी धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2018 2:19 AM

तज्ज्ञांनी व्यक्त केली भीती : पर्यावरण सांभाळून विकासकामे करण्याचे आवाहन

मुंबई : दिवसेंदिवस वाढत जाणारे प्रदूषण, वाढत्या तापमानाचा परिणाम मानवासह पशुपक्ष्यांवर होत आहे. यामुळे निसर्गातील जीवसृष्टी धोक्यात आली असून, येत्या काळात त्याचे गंभीर परिणाम माणसाला भोगावे लागणार आहेत. मुंबईत विकासाच्या नावाखाली पर्यावरणावर घाला घातला जात आहे. झाडांची मोठ्या प्रमाणावर कत्तल, वातावरणातील धूलीकण, अनियोजित शहररचना या कारणांमुळे अन्नसाखळी कमालीची विस्कळीत झाली आहे. पाणथळ जागा आणि तिवरांच्या प्रदेशावर होत असलेले अतिक्रमण पुढील पिढीसाठी धोक्याची घंटा आहे. भविष्यात अन्नाचा स्रोत कमी होणार आहे. त्यातून वेगवेगळे गंभीर आजार माणसाला जडण्याची शक्यता आहे. त्यामुळे विकास जरूर करा, पण पर्यावरण सांभाळून, असे आर्जव तज्ज्ञांनी सरकारकडे केले आहे. यासंदर्भात ‘लोकमत’ने तज्ज्ञांकडून त्यांची मते जाणून घेतली.पर्यावरणतज्ज्ञ गिरीश राऊत यांनी सांगितले की, राज्यासह मुंबईची सध्याची पर्यावरणीय स्थिती अत्यंत दयनीय बनली आहे. पर्यावरण पूर्णपणे नष्ट करण्यात येत असल्याचे चित्र आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालात मुंबई चौथ्या क्रमांकावरील प्रदूषित शहर बनले आहे. हीच परिस्थिती राज्यातील ग्रामीण आणि शहरी भागांची आहे. बुलेट ट्रेन, राजापूरची रिफायनरी, समृद्धी, नाणार प्रकल्प, पालघर जिल्ह्यातील हायवे, औद्योगिक प्रकल्प पर्यावरणाचा नाश करणारे आहे. महाराष्ट्राची वाटचाल वाळवंटाकडे सुरू आहे. विकासात्मक प्रकल्पात पर्यावरणाला दुर्लक्षित केले जाते. रिफायनरी प्रकल्पामुळे समुद्री प्रदूषण होत आहे. त्यातून समुद्र काळा होऊन मासे मोठ्या संख्येने मृत पावत आहेत. लोकांना वेगवेगळे आजार जडत आहेत. महिलांमध्येही आजारांचे प्रमाण वाढत आहे. जैवविविधता धोक्यात येत असल्याचीच ही लक्षणे आहेत.पाणथळ जागा आणि तिवरांच्या प्रदेशामुळे समुद्राकडून येणाऱ्या वादळाला, महाप्रलयाला रोखले जाते. मात्र, या भागात अतिक्रमण वाढल्यामुळे तिवरांचे प्रदेश अवघे १५ ते २० टक्के उरले आहेत. २० वर्षांपूर्वी तिवरांच्या प्रदेशाचे प्रमाण ५० टक्के होते. तिवरांचे क्षेत्र नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे समुद्राची आणि समुद्री जिवांची कमालीची कोंडी होत आहे. त्यातून अनेक समुद्री जिवांचे जीवन धोक्यात आले आहे. औद्योगिकीकरण, शहरीकरण, वीजनिर्मिती उद्योग, बांधकाम, वाहतूक, रासायनिक शेती यामुळे प्रदूषण वाढले आहे. त्यामुळे तापमानात वाढ होत आहे. त्याचे विपरीत परिणाम मानवासह पशुपक्ष्यांवर होत आहेत. यामुळे संपूर्ण जैवविविधता सध्या धोक्याच्या सीमारेषेवर आहे. मात्र, याकडे कोणीही लक्ष देत नाही. त्यामुळे एक दिवस पृथ्वीला शरण जाण्याशिवाय पर्याय राहणार नाही, असेही ते म्हणाले.प्लॅन्ट अ‍ॅण्ड अ‍ॅनिमल वेल्फेअर सोसायटीचे सचिव सुनिश कुंजू यांनी सांगितले, वन्यजीव कायद्यांतर्गत सर्व पशुपक्ष्यांना संरक्षित करणे आवश्यक आहे. ‘शेड्यूल १’मधील पक्ष्यांना कायद्याकडून संरक्षण आहे. मात्र, शेड्यूल २ ते ५ दरम्यान असलेल्या पक्ष्यांना कायद्याद्वारे विशेष संरक्षण नाही. त्यामुळे चिमणी, घार, गिधाड यांसारखे पक्षी नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.परदेशातून येणाºया पाहुण्यांना वन्यजीव कायद्यांतर्गत संरक्षण नाही. त्यामुळे या पक्ष्यांचे जीवनमान धोक्यात आहे. पक्ष्यांच्या संवर्धन आणि सुरक्षिततेसाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे. नामशेष होणाºया पक्ष्यांचे संवर्धन करणे आवश्यक आहे. वाढत्या उष्णतेमुळे साप बाहेर येत आहेत. या सर्व गोष्टींमुळे जैवविविधता धोक्यात आली आहे.शाश्वत विकास होणे गरजेचे...विकासात्मक प्रकल्प राबविताना शाश्वत विकास होणे अत्यंत गरजेचे आहे. निसर्गाचा ºहास होत आहे, हे कळत असतानादेखील विकासात्मक प्रकल्प राबविले जातात. याचा परिणाम सध्याच्या पिढीला जाणवणार नाही. मात्र, पुढच्या पिढीला याच्या परिणामाला सामोरे जावे लागेल. विकास करताना निसर्गाला एकरूप असे प्रकल्प राबविणे आवश्यक आहे. जल, जमीन, हवा प्रदूषणात मोठी वाढ होत आहे. कंपनीमधील केमिकलयुक्त पाणी आणि हवेमुळे प्रदूषण वाढत आहे. मात्र, यावर कुणीही विचार करत नाही. देशातील प्रत्येक नदी प्रदूषित आहे. यावर उपाय म्हणून सरकारसह नागरिकांनी पर्यावरण वाचविण्यासाठी सहभाग घेतला पाहिजे. पर्यावरणविषयक कायद्याचे पालन करणे आवश्यक आहे. तेव्हाच निसर्गाचे संवर्धन करणे शक्य आहे.- दीपक आपटे, संचालक, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी 

टॅग्स :प्रदूषणमुंबई