मुंबई : मुलुंडच्या पुरंदरे विद्यालयातील शिष्यवृत्ती घोटाळा प्रकरणी तपासासाठी मुलुंड पोलिसांनी बुधवारी समाजकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांना तत्काळ हजर राहण्याचे आदेश लेखी पत्राद्वारे दिले आहेत. यामध्ये घोटाळ्याची शहानिशा करून संबंधितांवर गुन्हे दाखल करत कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती मुलुंड पोलिसांनी दिली. मुलुंड पश्चिमेकडील श्रीमती नलिनीबाई गजानन पुरंदरे विद्यालयाने अनुसूचित जाती-जमातीच्या विद्यार्थिनींसाठी दिल्या जाणाऱ्या सावित्रीबाई फुले शासकीय शिष्यवृत्तीच्या पैशांचा वापर शाळेच्या दैनंदिन वापरासह, वीज बिल, पाणी बिलासाठी करण्यात आल्याचे २०१२ मध्ये उघड झाले. शाळा प्रशासनाने पाचवी ते दहावीतल्या २३६ अनुसूचित प्रवर्गांतील विद्यार्थिनींना योजनेंतर्गत शिष्यवृत्ती मंजूर असतानाही २००७-२०११ या काळात शिष्यवृत्तीचे वाटप केलेच नाही. धक्कादायक म्हणजे १ लाख ४३ हजार १५५ रुपयांचा शिष्यवृत्तीचा निधी शाळेने शासनाकडून घेतला होता. या प्रकरणी समाज कल्याण विभागाने समिती नेमून कारवाई करण्याचे आदेश दिले होते. तीन वर्षे उलटली तरी कारवाई नेमकी कोणी करायची? या विचारात प्रशासन आहे. त्यात समाजकल्याण विभाग आणि शिक्षण विभाग एकमेकांकडे बोट दाखवत असल्याने कारवाईला विलंब होत आहे. त्याला आता तीन वर्षे उलटली आहेत. या प्रकरणाला ‘लोकमत’मध्ये बुधवारच्या अंकात वाचा फोडण्यात आली. या वृत्ताने शिक्षण क्षेत्रातील सर्वांचेच धाबे दणाणले असल्याचे दिसून येत आहे. आज या वृत्ताची दखल घेऊन मुलुंड पोलिसांनी समाजकल्याण विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना तत्काळ हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. (प्रतिनिधी)
पोलिसांचे समाजकल्याण विभागाला पत्र
By admin | Updated: April 23, 2015 06:58 IST