मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी मुंबईच्या सागरी किनाऱ्याची हावरक्राफ्टने पाहणी केली. सागरी किनाऱ्याच्या सुरक्षिततेतील त्रुटी दूर करण्यात येतील, असे त्यांनी पत्रकारांना सांगितले. सागरी सुरक्षेविषयीच्या उपाययोजनांमध्ये त्रुटी असून, त्या दूर करण्यासाठी लवकरच कोस्टल गार्ड आणि शासकीय अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक बोलावणार आहोत. तसेच खारफुटीची कत्तल थांबविण्यासाठी लवकरच सॅटेलाईट मॉनिटरिंग पद्धतीचा अवलंब करण्यात येईल, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, सिंधुदुर्ग येथील रखडलेला अंडर वॉटर सीवर्ल्ड प्रकल्पाच्या मार्गातील सर्व अडथळे दूर केले आहेत. येत्या काही महिन्यांत या प्रकल्पाचे काम सुरू होईल. शेतकऱ्यांची भूसंपादनास सहमती आहे. नुकसानभरपाई लवकरच दिली जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. मुख्यमंत्र्यांनी ऐरोली-दिवा खाडीकिनाऱ्यावर खारफुटीच्या रोपांची लागवड केली. तसेच खारफुटीला उपयुक्त ठरणाऱ्या खेकडा प्रजनन केंद्राचे उद्घाटन केले. या वेळी मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी, सचिव प्रवीण दराडे, आ. संदीप नाईक, मुख्य वनसंरक्षक एन. वासुदेवन, पोलीस आयुक्त के.एल. प्रसाद आदी उपस्थित होते. (विशेष प्रतिनिधी)ऐरोली-दिवा खाडीकिनाऱ्यावर हिवाळ्यात फ्लेमिंगो व इतर परदेशी पक्ष्यांचे थवे पाहायला मिळतात. मात्र खाडीच्या किनाऱ्यालगत खारफुटी व दलदल असल्याने पक्षिप्रेमींना याचा आनंद लुटता येत नाही. त्यावर उपाय म्हणून वन विभागाच्या माध्यमातून दिवा खाडी किनाऱ्याजवळ पाण्यापर्यंत पोहोचण्यासाठी जेटी बनविण्यात येणार आहे. तसेच याच परिसरात विविध सागरी पक्ष्यांची संपूर्ण माहिती, मच्छीमारी करण्याचे प्रकार, त्यांची पद्धती, मच्छीमारांचे जीवन आदींची संपूर्ण माहिती उपलब्ध व्हावी. यासाठी दिवा खाडीकिनाऱ्यावर जर्मन कंपनीच्या माध्यमातून मरिन इंटरप्रीटेशन सेंटर उभारण्याची योजना असल्याची माहिती मुख्य वन संरक्षक अधिकारी एन. वासुदेवन यांनी या वेळी दिली.
सागरी किनाऱ्याच्या सुरक्षेतील त्रुटी दूर करू
By admin | Updated: February 3, 2015 01:42 IST