Join us  

शहरातील तांत्रिक कामांकरिता घेतला जाणारा सल्ला IITच्या नावे खपवला जाणार नाही याची काळजी घेऊ!

By रेश्मा शिवडेकर | Published: May 10, 2024 11:27 PM

६ मे रोजी डॉ. शिरीष केदारे यांनी मुंबई आयआयटीच्या संचालक पदाचा कार्यभार स्वीकारला

रेश्मा शिवडेकर, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: शहरातील विविध कामांकरिता घेतला जाणारा आयआयटी सल्ला हा खरेतर संस्थेचा नसतो. मुळात आयआयटीला असे सल्ले देताच येत नाहीत. यापुढे या प्रकारचे तांत्रिक सल्ले सरसकट आयआयटीच्या नावावर खपवले जाणार नाहीत, याची काळजी घेऊ, असे मुंबईच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे (आयआयटी) संचालक डॉ. शिरीष केदारे यांनी स्पष्ट केले.

६ मे रोजी केदारे यांनी मुंबई आयआयटीच्या संचालक पदाचा कार्यभार स्वीकारला. तंत्रशिक्षणाव्यतिरिक्त आयआयटी राबवित असलेल्या विविध उपक्रमांची माहिती त्यांनी यावेळी दिली. त्यावेळी आयआयटीकडे येणाऱ्या तांत्रिक सल्लाविषयक कामांबाबत त्यांना विचारणा कऱण्यात आली.

उदा. बर्फिवाला उड्डाणपूल, रस्ते बांधणी, मलबार हिल जलाशय अशा शहरातील अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांबाबत आयआयटीचा सल्ला घेतला जात असल्याचे सांगितले जाते. अनेकदा या सल्ल्यावरून वादही उद्भवतात.

याबाबत केदारे यांना विचारले असता ते म्हणाले की, आयआयटी या प्रकारचे तांत्रिक सल्ले देण्याकरिता अॅक्रिडीडेटेड नाही. ही कामे आयआयटीच्या त्या त्या विषयातील तज्ज्ञ प्राध्यापकांना वैयक्तिक स्तरावर दिली गेलेली असतात. त्याचा आयआयटीशी काहीही संबंध नसतो. यापुढे हे तांत्रिक सल्ले आयआयटीच्या नावाने खपवले जाणार नाही, याची काळजी घेऊ, असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :आयआयटी मुंबई