अजित जाधव -- महाबळेश्वरमहाबळेश्वरातील प्रसिद्ध वेण्णा लेक शेजारील माथ्यावर गेल्या अनेक वर्षांपासून घोडसवारी सुरू आहे. घोडसवारीमुळे उडालेल्या प्रचंड धुळीमुळे हा तलाव प्रदूषणाच्या विळख्यात सापडला असून, धूळ व घोड्यांच्या लिदीमुळे पर्यटकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. एवढे असूनही पालिका प्रशासनाचे मात्र गांधारीची भूमिका घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. महाबळेश्वरात थंड हवा खाण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना मात्र ‘धूळ’ फ्री मिळत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.येथील वेण्णा लेकचे विस्तारीकरण सुमारे १२ वर्षांपूर्वी करण्यात आले आहे. विस्तारीकरणामुळे तलावाची उंची वाढून तलावातील पाणीसाठ्यात पाचपट वाढ झाली आहे. या धरणातून महाबळेश्वर व पाचगणी या दोन शहरांना पाणीपुरवठा केला जातो. या विस्तारित तलावाशेजारी धरण योजनेची भिंत आहे. सुमारे दोन एकर क्षेत्रात ही भिंत पसरली आहे.या धरण माथ्याचा वापर सध्या वाहनतळ म्हणून केला जातो. तसेच याठिकाणी मोठ्या प्रमाणात घोडसवारी सुरू असते. सुमारे शंभरहून अधिक घोडे व्यावसायिक या ठिकाणी व्यवसाय करतात. घोड्यांच्या धावण्यामुळे धरण माथ्यावरील धुळीचे लोटच्या-लोट उडत असून, यामुळे सदाहरित वेण्णा लेक परिसर मातीमुळे लालभडक व प्रदूषित झाला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ही परिस्थिती जैसे थे आहे. घोड्यांची लिद व माती यामुळे पर्यटकांना त्रास होत आहे, तसेच जलप्रदूषणाचा धोकाही निर्माण झाला आहे.सध्या येथे दिवाळी पर्यटनासाठी महाबळेश्वरात पर्यटक मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत. येथे येणारे पर्यटक वेण्णा लेकात नौकाविहार करतात. नौकाविहारासाठी हजारो पर्यटक दिवसभर वेण्णा लेक परिसरात फिरत असतात; मात्र त्यांना स्वच्छ व निरोगी हवा मिळण्याऐवजी धुळीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे पर्यटकांचा हिरमोड होत आहे. स्थानिक नागरिकांनाही याचा वाईट अनुभव येतो. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी पालिका प्रशासन मात्र उदासीन दिसत आहे. जलप्रदूषणामुळे होणारा संभाव्य धोका टाळण्यासाठी व पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी पालिकेने ठोस पावले उचलणे गरजेचे आहे. चला महाबळेश्वरला; थंड हवेत धूळ चाखायलापर्यटक त्रस्त : घोडसवारीमुळे उडतायेत धुळीचे लोट; वेण्णा तलाव परिसराला प्रदूषणाचा विळखा; पालिकेचे मात्र दुर्लक्षमहाबळेश्वर एक जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ आहे. याठिकाणी आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून फिरण्यासाठी येत आहे. वेण्णा लेक परिसर पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र आहे. मात्र, येथील समस्या अनेक वर्षांपासून जैसे थे आहे. प्रशासनाने याबाबत उपाययोजना करणे गरजेचे आहे. घोड्यांच्या धावण्यामुळे उडणाऱ्या धुळीमुळे मोठा त्रास होतो.- अरविंद नाईक, पर्यटक, पुणे उद्यानाचे भिजत घोंगडे वेण्णा लेक पूर्ण झाल्यानंतर त्याच्या भिंतीवर पर्यटकांसाठी उद्यान विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यासाठी शासनस्तरावर हालचालीही सुरू झाल्या होत्या. पालिकेने यासाठी सकारात्मक तयारी दाखवून सुशोभीकरणासाठी निविदाही काढली होती; मात्र शासनाच्या लालफितीच्या कारभारात उद्यानाचे भिजत घोंगडे गेल्या अनेक वर्षांपासून तसेच आहे.
चला महाबळेश्वरला; थंड हवेत धूळ चाखायला
By admin | Updated: November 17, 2015 00:03 IST