Join us
Daily Top 2Weekly Top 5

वंचित महिलांसाठी अभ्याक्रमाचा विचार व्हावा

By admin | Updated: July 6, 2016 02:46 IST

एसएनडीटी विद्यापीठ हे सरस्वतीचे मंदिर आहे. शिक्षणापासून वंचित राहिलेल्या महिलांना शिक्षण मिळावे यासाठी खास अभ्यासक्रमाची आखणी करा, असे आवाहन राज्यपाल विद्यासागर

मुंबई : एसएनडीटी विद्यापीठ हे सरस्वतीचे मंदिर आहे. शिक्षणापासून वंचित राहिलेल्या महिलांना शिक्षण मिळावे यासाठी खास अभ्यासक्रमाची आखणी करा, असे आवाहन राज्यपाल विद्यासागर राव यांनी एसएनडीटी विद्यापीठाच्या शतकपूर्ती सोहळ्यात केले. श्रीमती नाथीबाई ठाकरसी महिला विद्यापीठाचा शतकपूर्ती सोहळा मंगळवारी चर्चगेट येथील पाटकर सभागृहात पार पडला. या वेळी राज्यपाल बोलत होते. याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षणमंत्री विनोद तावडे, एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या नवनियुक्त कुलगुरू डॉ. शशिकला वंजारी, कुलसचिव शांताराम बडगुजर उपस्थित होते. राज्यपाल म्हणाले की, धोंडो केशव कर्वे यांनी स्त्री शिक्षणासाठी स्थापन केलेल्या या ज्ञानमंदिराचा विस्तार करावा. आधुनिक अभ्यासक्रम आणि नावीन्यपूर्ण शिक्षणपद्धतीतून देश-विदेशातील हुशार विद्यार्थ्यांना आकर्षित करावे. उत्तम शिक्षक पुरविण्याचे आव्हान स्वीकारावे, असेही ते म्हणाले. मुख्यमंत्री म्हणाले, ‘शिक्षणासाठी स्त्रियांनी समाजाशी लढा दिला आहे. तिच जिद्द त्यांनी आजतागायत कायम ठेवली आहे. कोणत्याही परीक्षेच्या निकालात मुलींची आघाडी पाहून अभिमान वाटतो.’ तर शिक्षणमंत्री विनोद तावडे म्हणाले की, ‘एसएनडीटी विकासाची ब्लू प्रिंट तयार करा, विद्यापीठाच्या विकासासाठी प्रयत्नशील राहू’. या शतकपूर्ती सोहळ्यावेळी शिक्षकेतर कर्मचारी पुरस्काराचे वितरण करण्यात आले. शतक महोत्सवी वर्षानिमित्त टपाल विभागाने काढलेल्या विशेष टपाल तिकिटाचे प्रकाशन राज्यपालांच्या हस्ते झाले. विद्यापीठाच्या संशोधन केंद्राने काढलेल्या वार्तापत्राचे प्रकाशनही या वेळी करण्यात आले. (प्रतिनिधी)