Join us  

बालरक्षकांच्या मदतीमुळे ‘तो’ गिरवणार शिक्षणाचे धडे

By ऑनलाइन लोकमत | Published: May 05, 2019 5:14 AM

वडील वारल्यानंतर आईचे दुसरे लग्न झाले आणि लहानग्या रोहनला सोडून ती निघून गेली. रोहन मामा, आजोबांसोबत राहू लागला. शेजाऱ्यांनाही त्याचा लळा लागल्याने तेदेखील त्याचा सांभाळ करू लागले.

- सीमा महांगडेमुंबई - वडील वारल्यानंतर आईचे दुसरे लग्न झाले आणि लहानग्या रोहनला सोडून ती निघून गेली. रोहन मामा, आजोबांसोबत राहू लागला. शेजाऱ्यांनाही त्याचा लळा लागल्याने तेदेखील त्याचा सांभाळ करू लागले. त्यानंतर, आई परत आली. मात्र, आता ९ वर्षे वयाच्या रोहनला आईसोबत राहायची इच्छा नाही. बालरक्षकांनी रोहनचे समुपदेशन केले आणि त्याला बालगृहात प्रवेश देऊन त्याच्या राहण्याची सोय केली. लवकरच ते त्याला मुंबईतील उत्तम शाळेत दाखल करणार असल्याची माहिती बालरक्षक रामराव पवार यांनी दिली.मूळचे वाल्मिकी समाजाचे, हरयाणामध्ये राहणारे रोहनच्या आईचे कुटुंब उदरनिर्वाहासाठी मुंबईत आले. पुढे रोहनच्या आईचे लग्न मुंबईतील मुलाशी झाले. रोहनचा जन्म झाला. सर्व आलबेल आहे, असे वाटत असतानाच रोहनचे वडील वारले आणि कुटुंब पोरके झाले.रोहनच्या चुलत आजोबांनी त्याच्या आईचे दुसरे लग्न लावून दिले आणि ती रोहनला सोडून नवºयासोबत राजस्थानला निघून गेली. रोहन सांताक्रुझ येथे मामा, आजोबांसह राहत होता. शेजाऱ्यांना त्याचा लळा लागल्याने तेदेखील त्याचा सांभाळ करू लागले. तिकडे दुसºया लग्नानंतर रोहनच्या आईला मुंबईत येण्यास बंदी घालण्यात आली. तिचा मानसिक छळ सुरू झाला. अखेर या छळाला कंटाळून तिने मुंबईला पळ काढला.मुुंबईत आल्यानंतर वडील, भावासोबत ती राहू लागली. ते सांताक्रुझचे घर सोडून वांद्रे येथे राहायला गेले. सोबत रोहनलाही घेऊन गेले. त्यामुळे प्रेमळ शेजाºयांपासून रोहन दुरावला. उदरनिर्वाहसाठी ती धुणीभांडी करू लागली. तिने रोहनला वांद्रे येथील एका शाळेत प्रवेश घेऊन दिला. मात्र, अनेकदा रोहन आईच्या नकळत शाळेतून पळून सांताक्रुझला जात असे. तेथील शेजाºयांच्या मुलांशी गुपचूप खेळत असे.बालरक्षकांची टीम एकदा रोहनच्या शेजारची मुले शिकत असलेल्या शाळेत विद्यार्थ्यांना भेटायला गेली असता, बोलण्याच्या ओघात त्या मुलांकडून त्यांना रोहनबाबत समजले. त्यांनी रोहनचे समुपदेशन केले. त्यावेळी त्याला घरातून चांगली वागणूक मिळत नसल्याने, आईकडे राहण्याची किंवा शाळेत शिकण्याची इच्छा नसल्याचे त्याने सांगितले.आरोपातील तथ्यजाणून घेण्याच्या सूचनाआईसोबत राहण्यापेक्षा आश्रमशाळेत किंवा वसतिगृहात राहू, अशी इच्छाही त्याने बोलून दाखविली. त्यामुळे बालरक्षकांच्या टीमने त्याची जबाबदारी स्वीकारून त्याला मानखुर्द येथील बालगृहात दाखल केले. त्याच्या आईची पार्श्वभूमी, तसेच रोहनने केलेल्या आरोपातील तथ्य जाणून घेण्याच्या सूचना बालकल्याण समितीने चाइल्ड हेल्प लाइनला दिल्याची माहिती बालरक्षक पवार यांनी दिली.

टॅग्स :मुंबई