अडरे : चिपळूण शहरातील परकार कॉम्प्लेक्स येथे फायर इंजिनिअरिंग अॅण्ड सेफ्टी मॅनेजमेंट कॉलेज सुरु करण्यात आले आहे. त्यासाठी आता कोकणातील विद्यार्थ्यांना पुणे, मुंबई, नागपूर यांसारख्या शहरात जाण्याची गरज भासणार नाही. यापुढे कोकणातील विद्यार्थ्यांना फायर इंजिनिअरिंगचे धडे चिपळुणात मिळणार आहेत, असे प्रतिपादन माजी आमदार रमेश कदम यांनी येथेकेले. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड या तीन जिल्ह्यांसाठी चिपळुणात हे कॉलेज सुरु करुन कोकणवासीयांना नवीन सुविधा उपलब्ध करुन दिली आहे, असे प्राचार्य आत्माराम जगताप यांनी सांगितले. फायर इंजिनिअरिंग म्हणजे अग्निशामक अभियांत्रिकीचे शिक्षण देणारी महाविद्यालये महाराष्ट्रात मोजकीच आणि मोठ्या शहरात आहेत. यामुळे प्राचार्य जगताप यांनी चिपळूण शहरात फायर इंजिनिअरिंगचे कॉलेज सुरु केले आहे. याचे उद्घाटन माजी आमदार रमेश कदम यांच्या हस्ते झाले. हे महाविद्यालय सुरू झाल्याने आता फायर इंजिनिअरिंगसाठी मोठ्या शहरात जाण्याची गरज नसल्याचे कदम यांनी सांगितले व अभ्यासक्रमाचे महत्त्व स्पष्ट केले.यावेळी रत्नागिरी जिल्हा बँकेचे अध्यक्ष तानाजी चोरगे, माऊली शिक्षण प्रसारक मंडळ, पुणेचे सचिव गिरीश मांडवकर, चिपळूण तालुका नागरी पतसंस्थेच्या नीलिमा जगताप, मनोहर महाडिक, प्रदीप निकम, फैयाज देसाई, कृष्णदास नलावडे, तन्वी जगताप, प्रियांका जगताप, अमेय जगताप उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निसार शेख यांनी केले. आभार प्रदर्शनानंतर कार्यक्रमाची सांगता झाली. (वार्ताहर)
फायर इंजिनिअरिंगचे धडे आता चिपळुणात मिळणार : कदम
By admin | Updated: August 13, 2014 23:29 IST