अजित मांडके ल्ल ठाणेठाणे महापालिकेने आपल्या शाळांमधूनही आता ई-लर्निंगचे धडे देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यानुसार, पहिल्या टप्प्यात आठ गटांतून आठ केंद्रांमध्ये हा प्रयोग करणार असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली. याशिवाय पहिली, दुसरीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पाठीवरील वह्या, पुस्तकांचे ओझेही कमी करण्याचा संकल्प शिक्षण विभागाने केला आहे. या महत्त्वाकांक्षी प्रोजेक्टसह विद्यार्थ्यांच्या विविध योजनांसाठी प्रशासनाने २० कोटींची तरतूद प्रस्तावित केली आहे. परंतु, विद्यार्थ्यांची शाळांमधील गळती, शाळांची दुरवस्था, शिक्षकांची कमतरता आणि पटसंख्येअभावी बंद केलेल्या काही वर्गांमुळे ही संकल्पना कितपत यशस्वी होणार, याबाबत मात्र साशंकता आहे. जि.प.च्या धर्तीवर आता उशिरा जाग आलेल्या ठाणे महापालिकेनेदेखील ही संकल्पना पुढे आणली आहे. २०१५-१६ च्या मूळ अंदाजपत्रकातही याचा समावेश केला आहे. १० ते १२ शाळांमध्ये हे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून पहिल्या टप्प्यात आठ केंदे्र सुरू करण्यात येणार आहेत. यामध्ये वर्तकनगर, मुंब्रा, कौसा, मानपाडा, कळवा, आनंदनगर या शाळांचा समावेश आहे. शाळेमधील एका वर्गामध्ये प्रोजेक्टर लावून या प्रोजेक्टरवर त्यांना गणित, इतिहास यासारखे कठीण विषय विविध प्रकारच्या चित्रांच्या आणि ग्राफिकच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिकविले जाणार आहेत. यापूर्वी केवळ ढोकाळी आणि सावरकरनगरच्या शाळेमध्ये आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना संगणकांच्या माध्यमातून शिकविले जात होते. ई-लर्निंगचा फायदा ८ ते १० हजार विद्यार्थ्यांना होणार असल्याचा दावा पालिकेने केला आहे. विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी दप्तराऐवजी वर्कशीट त्यांना शाळेत आणायला सांगितले जाणार आहे. पहिली आणि दुसरीच्या मुलांसाठी ही सुविधा देण्यात आली असून यामध्ये केवळ पुस्तकी शिक्षण न देता विविध प्रकारच्या प्रयोगांच्या माध्यमातून मुलांना शिक्षण दिले जाणार आहे. यामध्ये मुलांनी आपले वर्कशिट भरून केवळ तेच शाळेत आणणे अपेक्षित धरले आहे. विद्यार्थ्यांची शाळांमधील गळती, शाळांची दुरवस्था, शिक्षकांची कमतरता आणि पटसंख्येअभावी बंद केलेल्या काही वर्गांमुळे आणि काही तीन मजली शाळांमध्ये पहिली ते सातवीपर्यंत केवळ ४० ते ४५ विद्यार्थीच शिक्षण घेत आहेत. त्यामुळे हे प्रयोग यशस्वी होणार का, याबाबत मात्र शिक्षण विभागही साशंक आहे.
महापालिका शाळांतील विद्यार्थी गिरविणार ई-लर्निंगचे धडे
By admin | Updated: February 20, 2015 23:07 IST