चेतन ननावरे ल्ल मुंबई नववर्षाचे स्वागत आणि थर्टीफर्स्ट डिसेंबरला पार्टी करण्यासाठी अवघी मुंबापुरी सज्ज झाली असताना येथील पंचतारांकित हॉटेल्सने मात्र त्याकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे. मुंबईतील ताज, आयटीसी आणि आॅर्किड वगळता ओबेरॉय, ट्रायडन्ट, सोफीटेल, द लीला अशा नामांकित हॉटेल्सचा यात समावेश असल्याची माहिती हॉटेल अॅन्ड रेस्टॉरन्ट असोसिएशन वेस्टर्न इंडियाचे अध्यक्ष भारत मलकानी यांनी दिली.पंचतारांकित हॉटेल्ससोबत इतर वर्गातील हॉटेल मालकही मोठ्या संख्येने थर्टीफर्स्टच्या रात्री पार्टीचे आयोजन करण्याबाबत निरुत्साही आहेत. त्यातील पंचतारांकित हॉटेल मालकांचे कारण समजले नसले, तरी उत्पादन शुल्क विभागाच्या कराची रक्कम व लोकांमधील संभ्रमावस्थेमुळे सर्व सामान्य हॉटेल मालकांनी पार्टी आयोजित केलेली नाही, असे मलकानी यांनी सांगितले.तसेच उत्पादन शुल्क विभागाकडून प्रत्येक तिकीटीवर मनोरंजन कर म्हणून २५ टक्के कर आकारण्यात येतो. तर केवळ एका रात्री पार्टी आयोजित करण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाला पंचतारांकित हॉटेलपासून प्रत्येक प्रवर्गातील हॉटेल व्यवसायिकांना १० हजारांहून अधिक रुपये कर स्वरूपात भरावे लागतात. परिणामी पंचतारांकित हॉटेल व्यवसायिकांच्या तुलनेत आकाराने लहान असलेल्या हॉटेल, रेस्टॉरन्ट आणि बार मालकांना ही रक्कम महागडी वाटत आहे. त्यामुळे नुकसान होण्यापेक्षा पार्टीच नको, असा पवित्रा सर्वसामान्य व्यवसायिकांनी घेतल्याचा दावा मलकानी यांनी केला आहे.मद्यपींसाठी टॅक्सी उपलब्ध करामद्य सेवन केलेल्या ग्राहकांना स्वत:हून वाहन चालवू न देता, त्यांच्यासाठी टॅक्सी किंवा रिक्षाची व्यवस्था करण्याचे आवाहन संघटनेने केले आहे. त्यासाठी हॉटेल व्यवसायिकांनी हॉटेलबाहेरील रिक्षा किंवा टॅक्सी स्टँडजवळ संबंधित संघटनांना नेहमीच्या मानाने अधिक वाहने उभे करण्याचे आवाहन करावे.खाजगी सुरक्षारक्षकांची मदत घ्याथर्टीफर्स्टला हॉटेल किंवा हॉटेलबाहेर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून खाजगी सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्यास संघटनेने सांगितले आहे. यावेळी हॉटेलमध्ये येणाऱ्या महिला वर्गाच्या सुरक्षेकडे विशेष लक्ष देण्याचे आवाहनही संघटनेने केले आहे.महिला कर्मचाऱ्यांना घरपोच सोडाज्या हॉटेल, रेस्टॉरन्ट आणि बारमध्ये थर्टीफर्स्टसाठी उशिरापर्यंत पार्टी सुरू असणार आहे, अशा व्यवसायिकांनी त्या-त्या ठिकाणी काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना रात्री पिकअप आणि ड्रॉप सेवा उपलब्ध करण्याचे आवाहन केले आहे.
पंचतारांकित हॉटेल्सची थर्टीफर्स्टकडे पाठ
By admin | Updated: December 31, 2014 00:55 IST