मुंबई : डेंग्यूने गेल्या वर्षी मुंबईत डोके वर काढले होते. पंधरवड्यापासून मुंबईत पाऊस झाला नसला तरीही साठलेल्या पाण्यामुळे होणारा लेप्टो आणि डासांमुळे होणारा मलेरिया या दोन्ही आजरांचा धोका मुंबईत वाढल्याचे चित्र आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच लेप्टोचे दोन बळी गेले आहेत. २ जुलैला दहिसर आणि कांदिवली भागात राहणाऱ्या दोघांचा लेप्टोमुळे मृत्यू झाला. कांदिवली येथील १६वर्षीय मुलाला २८ जून रोजी त्रास जाणवू लागला. १ जुलैला त्याला महापालिका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान २ जुलैला त्याचा मृत्यू झाला. दहिसर येथे राहणाऱ्या ३०वर्षीय पुरुषास २७ जून रोजी लेप्टोची लक्षणे दिसून आली होती. खासगी डॉक्टरकडे तपासणी झाल्यावर औषधे सुरू केली होती. यानंतर १ जुलैला त्याला खासगी नर्सिंग होममध्ये दाखल करण्यात आले. त्याच दिवशी महापालिका रुग्णालयात हलवण्यात आले. यानंतर त्याचा २ जुलैला मृत्यू झाला. जुलैच्या पहिल्या आठवड्यात पावसाने पडला नसतानाही मुंबईकरांचे आरोग्य बिघडल्याचे दिसून येत आहे. १ जुलै ते ४ जुलैदरम्यान मलेरियाचे ८० रुग्ण आढळून आले आहेत. तर तापाचे १ हजार ६८ रुग्ण आढळून आले आहेत. मुंबईत लेप्टोचे संशयित १५ रुग्ण आढळून आले आहेत. गॅस्ट्रोचे ६६ रुग्ण आढळून आले आहेत. टायफॉईड आणि हॅपिटायटिसचे अनुक्रमे २० आणि १६ रुग्ण आढळून आले आहेत.
मुंबईत लेप्टोने दोघांचा मृत्यू
By admin | Updated: July 6, 2015 02:34 IST