Join us  

बोरीवलीच्या नॅशनल पार्कात बिबट्या, तीन वाघाटींचे झाले आगमन

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2018 4:08 AM

बोरीवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात एका बिबट्यासह तीन वाघाटींचे आगमन झाले आहे. अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा येथून बिबट्याचा बछडा नुकताच नॅशनल पार्कात दाखल झाला आहे.

मुंबई : बोरीवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात एका बिबट्यासह तीन वाघाटींचे आगमन झाले आहे. अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा येथून बिबट्याचा बछडा नुकताच नॅशनल पार्कात दाखल झाला आहे. तसेच पुण्यातील वडगाव मावळ वनपरिक्षेत्रातून बेवारस स्वरूपात तीन वाघाटीची पिल्ले आढळून आली होती. याचेही संगोपन आता नॅशनल पार्कात केले जाणार असल्याचे उद्यान प्रशासनाने सांगितले.नेवासा येथील वंजारवाडीतील शिवाजी डोळे यांच्या उसाच्या शेतात काही दिवसांपूर्वी पाचट पेटवले होते. उसाच्या फडात आश्रयाला गेलेल्या बिबट्याच्या तीन बछड्यांपैकी दोन बछड्यांचा होरपळून मृत्यू झाला. आई न परतल्यामुळे या बछड्याचे संगोपन नगरच्या वनविभागातील कर्मचाऱ्यांनी केले. गेल्या वर्षी सूरज, तारा आणि अतिश हे बिबटे नॅशनल पार्कात आले होते. आईपासून विलग झाल्याने त्यांचा सांभाळ करण्याची जबाबदारी उद्यान प्रशासनावर सोपविण्यात आली आहे, अशी माहिती संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे वनक्षेत्रपाल संजय वाघमोडे यांनी दिली.संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात कात्रजमधील राजीव गांधी प्राणी अनाथालयातून तीन वाघाटीची (रस्टी स्पॉटेड कॅट) पिल्ले उद्यानात आणण्यात आली आहेत. मावळ येथील वडगावमधील उसाच्या शेतात आईविना आढळलेल्या या पिल्लांचा सांभाळ कात्रजमधील उद्यानात करण्यात आला. सध्या तिन्ही वाघाटींची जबाबदारी उद्यान प्रशासनाच्या संगोपन केंद्राकडे देण्यात आली आहे. नामशेष होण्याची भीती असलेल्या वाघाटीच्या या तीन पिल्लांमध्ये दोन मादी आणि एक नर आहे. ही तिन्ही पिल्ले अनाथ अवस्थेत स्थानिकांच्या नजरेस पडली होती. वाघाटीच्या पिल्लांना सकाळी दूध, दुपारी २५ गॅ्रम मांस असा दिवसभराचा आहार उद्यान प्रशासन देत आहे, असेही वाघमोडे यांनी सांगितले.

टॅग्स :मुंबई