Join us  

आरेत धूमाकूळ घालणारा बिबट्या अखेर जेरबंद; वनखात्याची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2021 9:57 AM

या बिबट्याला आज सकाळी सात वाजता  संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात घेऊन जाण्यात आले असून त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे. आरेत धूमाकूळ घालणारा हाच तो बिबट्या आहे का? याची आम्ही शहानिशा करणार आहे, असे देसले म्हणाले.

मनोहर कुंभेजकर -मुंबई - गेल्या महिनाभर आरेत धूमाकूळ घालणारा बिबट्या अखेर जेरबंद झाला आहे. आरे युनिट नंबर 3 मध्ये काल वनखात्याने पिंजरा लावला होता. वनखात्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रात्री जागता पहारा ठेवला होता. दोन दिवसांपूर्वी बिबट्याचे पिल्लूदेखील सापडले होते. आज पहाटे 3 च्या सुमारास बिबट्या पिंजऱ्याच्या सापळ्यात जेरबंद झाला. वनखात्याचे तळाशी येथील रेंज ऑफिसर दिनेश दिसले यांनी लोकमतला या शुभवर्तमानाची बातमी दिली. यामुळे आता येथील नागरिकांना मोठा दिलासा मिळेल.

या बिबट्याला आज सकाळी सात वाजता  संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात घेऊन जाण्यात आले असून त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे. आरेत धूमाकूळ घालणारा हाच तो बिबट्या आहे का? याची आम्ही शहानिशा करणार आहे, असे देसले म्हणाले.

उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदार संघाचे खासदार व शिवसेना नेते गजानन कीर्तिकर यांनि बिबट्याला जेरबंद केल्याची माहिती लोकमतच्या प्रतिनिधीला दिली आणि वनखात्याच्या या धाडसी अधिकाऱ्यांना त्यांनी शाबासकी दिली. आहे. लोकमत ऑनलाईन आणि लोकमतमधून आरे आणि न्यू दिंडोशी म्हाडा वसाहतीत दहशत निर्माण करणाऱ्या बिबट्याच्या ठावठिकाणाच्या बातम्या सातत्याने प्रसिद्ध करून लोकप्रतिनिधी आणि वनखात्याचे लक्ष वेधले होते.

गेल्या महिनाभरात आरेत पाच जणांवर बिबट्याने हल्ला केला होता. यामुळे येथील नागरिकांमध्ये घबराट पसरली होती.दि,26 रोजी आयुष यादव या चार वर्षाच्या बालकावर बिबट्याने हल्ला केला होता. तर दि,28 रोजी आरेत 64 वर्षीय महिलेवर बिबट्याने हल्ला केला. मात्र या वाघीण महिलेने हातातील काठीने स्वतःचा जीव वाचवण्यासाठी त्याला प्रतिउत्तर देत पळवून लावले. तर काल रात्री आठच्या सुमारास आरे युनिट नंबर 7 येथे आपल्या मित्राला भेटायला गेलेला गोरेगाव पूर्वमधील संतोष नगर येथील तरुणावर बिबट्याने हल्ला केला. बिबट्या गेल्या महिनाभर रात्री अंधार पडल्यावर नागरिकांवर हल्ला करतो.त्यामुळे येथील नागरिक रात्री काय दिवसासुद्धा घरातून बाहेर पडायला घाबरत होते.आता बिबट्या जेरबंद झाला असला तरी येथील उर्वरित बिबट्यानादेखिल जेरबंद करावे अशी मागणी येथील सामाजिक कार्यकर्ते निलेश धुरी यांनी केली आहे.

टॅग्स :बिबट्याआरेवनविभाग