Join us  

बिबट्या गोंधळलेल्या अवस्थेत शिरला म्हशीच्या गोठ्यात, लागला होता भटक्या श्वानाच्या मागे

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2020 10:00 AM

मुळात येथील दीडदोनशे म्हशी आणि तबेल्यातील कर्मचाऱ्यांनी त्याला हटकल्यानंतर बिबट्याने धूम ठोकली असली तरीही विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई महापालिकेची वाहने भटक्या कुत्र्यांना आरेनजीक सोडते आणि याच भटक्या कुत्र्यांच्या मागे लागत बिबट्या मनुष्य वस्तीमध्ये प्रवेश करतो.

मुंबई : भटक्या कुत्र्याच्या मागे लागून गोंधळलेल्या अवस्थेत  मंगळवारी सकाळी पहाटे ७ वाजता आरे कॉलनीमधल्या म्हशीच्या तबेल्यात शिरलेला बिबट्या आणखीच गोंधळला. मुळात येथील दीडदोनशे म्हशी आणि तबेल्यातील कर्मचाऱ्यांनी त्याला हटकल्यानंतर बिबट्याने धूम ठोकली असली तरीही विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई महापालिकेची वाहने भटक्या कुत्र्यांना आरेनजीक सोडते आणि याच भटक्या कुत्र्यांच्या मागे लागत बिबट्या मनुष्य वस्तीमध्ये प्रवेश करतो.महापालिका पकडलेल्या भटक्या कुत्र्यांना आरे नजीकच्या परिसरात सोडते आहे. गेल्या काही दिवसांपासून हे प्रमाण वाढत आहे. बिबट्याकडून माकड, हरिण आणि सशाची शिकार केली जाते. मात्र यांची शिकार करण्याच्या तुलनेत कुत्र्याची शिकार करणे बिबट्याला सहज सोपे असते. परिणामी माकड, ससा आणि हरिणाची शिकार करण्याऐवजी बिबट्याकडून कुत्र्याची शिकार केली जाते.मंगळवारीही असेच घडले. मंगळवारी सकाळी ७ वाजता आरे कॉलनीमधील म्हशी गोठ्यात शिरलेला बिबट्या हा कुत्र्याच्या मागे लागत गोठ्यापर्यंत आला होता. मात्र येथे दाखल होतानाच गोंधळलेल्या अवस्थेत असलेला बिबट्या गोठ्यात शिरल्यानंतर येथील दीडदोनशे म्हशी पाहून आणखी गोंधळला. काही वेळाने त्याने येथून धूमही ठोकली. मात्र दोन दिवसांपासून या घटनेचा व्हिडीओ समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरे कॉलनीमध्ये जे तबेले आहेत तेथील नागरिकांना सातत्याने बिबट्याचे दर्शन होत असते. हे काही यांच्यासाठी नवे नाही. मात्र गेल्या काही दिवसांपासून भटक्या कुत्र्यांच्या मागे लागत मनुष्य वस्तीत बिबट्याचे दाखल होण्याचे प्रमाण अधिक आहे.म्हशीच्या गोठ्यात बिबट्या दाखल होण्याची माहिती मिळताच बुधवारी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानचे कर्मचारी येथे दाखल झाले होते. त्यांनी या प्रकरणाची संपूर्ण माहिती घेतली. अडचण आल्यास मदतीसाठी क्रमांक दिले असून, जनजागृती केली आहे.

टॅग्स :बिबट्यामुंबई