Join us

शिवजयंतीनिमित्त ‘महाराज’ नाव ठेवलेल्या बिबट्यालाही रेडिओ कॉलर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:06 IST

मुंबई : शहरी बिबट्यांच्या जीवनशैलीचे रहस्य समोर यावे, बिबटे आणि माणसे यांच्यामधील संबंध आणखी चांगल्या पद्धतीने अभ्यासता यावेत, ...

मुंबई : शहरी बिबट्यांच्या जीवनशैलीचे रहस्य समोर यावे, बिबटे आणि माणसे यांच्यामधील संबंध आणखी चांगल्या पद्धतीने अभ्यासता यावेत, याकरिता बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या वतीने मुंबईतील बिबट्यांचा टेलिमेट्रीद्वारे अभ्यास सुरू करण्यात आला असून, त्यानुसार, सोमवारी (दि. २२) रेडिओ टेलिमेट्री प्रकल्पाचा एक भाग म्हणून उद्यानातील दुसऱ्या बिबट्याला रेडिओ कॉलर करून सुखरूपपणे सोडण्यात आले.

उद्यानाचे वनसंरक्षक मल्लिकार्जुन यांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितले की, २०१९ साली कॅमेरा ट्रॅपच्या साहाय्याने त्या बिबट्याचा प्रथम फोटो घेण्यात आला होता आणि तो मुंबईमधील बिबट्यांच्या डेटाबेसचा एक भाग आहे. या बिबट्याला स्थानिक कर्मचाऱ्यांनी ‘महाराज’ असे नाव दिले आहे. एक आठवड्यापासून त्याला पकडण्याची तयारी सुरू होती. वनविभागाचे कर्मचारी आणि इतर सहकाऱ्यांच्या अथक प्रयत्नांनंतर यश हाती आले आहे. शिवजयंतीचे निमित्त साधून या बिबट्याला ‘महाराज’ असे नाव देण्यात आले आहे.

शनिवारी (दि. २०) मुंबईतील पहिल्या मादी बिबट्याला कॉलर बसविण्यात आली होती अणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात सोडण्यात आले. त्या बिबट्या मादीचे नाव ‘सावित्री’ असे ठेवण्यात आले आहे. बिबट्या आणि माणूस एकमेकांशी कसा जुळवून घेतो. बिबटे मोठे रस्ते कसे ओलांडतात. उद्यानातील जागा आणि वेळ यांचा वापर ते कसा करतात. माणूस आणि बिबट्या यांच्यामधील संघर्ष कमी करण्यासाठी याची काही मदत होईल का? याचा अभ्यास याद्वारे केला जाणार आहे.