मुंबई : यंदाच्या विधानसभा निवडणुकीत बहुसंख्य नगरसेवकांना तिकीट मिळूनही संधीचे सोने करता आलेले नाही़ अनेक मतदारसंघांत चुरशीच्या व अटीतटीच्या ठरलेल्या लढतीत ४९ आजी-माजी नगरसेवकांपैकी १२ जणांना आमदारकीची लॉटरी लागली आहे़ यामध्ये शिवसेना सहा आणि भाजपाच्या पाच आजी-माजी नगरसेवकांचा समावेश आहे़ २००९ च्या विधानसभा निवडणुकीत नऊ जणांना उमेदवारी मिळाली होती़ मात्र या वेळेस युती-आघाडी ताटातुटीमुळे बहुसंख्य इच्छुक नगरसवेकांना उमेदवारी मिळाली़ काही महत्त्वाच्या मतदारसंघातून नगरसेवकांना मैदानात उतरविण्यात आले होते़ त्यात प्रतिष्ठा पणाला लागल्यामुळे अनेकांनी जीव ओतून प्रचार केला होता़ तरीही २० टक्केच आजी-माजी नगरसेवकांना विजयाचा किल्ला सर करता आला आहे़ २४ विद्यमान नगरसेवकांपैकी माजी महापौर सुनील प्रभू, माजी बेस्ट अध्यक्ष अशोक पाटील, भाजपा नेते गोपीनाथ मुंडे यांचे माजी सचिव व स्थायी समिती सदस्य अमित साटम, भाजपाच्या मनीषा चौधरी, तमील सेल्वन विजयी झाले़ तर शिवसेनेचे संजय पोतनीस, प्रकाश फातर्पेकर, तुकारात काते, रमेश लटके, भाजपाच्या विद्या ठाकूर, पराग अळवणी या माजी नगरसेवकांना आमदारकीची लॉटरी लागली आहे. अटीतटीच्या लढतीदिंडोशी मतदारसंघात माजी महापौर शिवसेनेचे सुनील प्रभू आणि काँग्रेसचे राजहंस सिंह यांच्या लढतीकडे विशेष लक्ष होते़ २००९ मध्ये प्रभू यांना सिंह यांनी पराभवाचा धक्का दिला होता़ मात्र या वेळेस प्रभू यांनी १९ हजार मताधिक्याने सिंह यांना मात दिली़ गोरेगावमधून प्रतिष्ठेची असलेली जागा भाजपाने खेचून आणली आहे़ माजी उपमहापौर विद्या ठाकूर यांनी शिवसेनेचे नेते व माजी आमदार सुभाष देसाई यांना पाच हजार मताधिक्याने पराभूत केले आहे़दहिसर - शिवसेनेचे माजी आमदार विनोद घोसाळकर यांच्या विरोधात महिला शक्ती येथे एकवटली होती़ भाजपा मनीषा चौधरी, मनसेतून डॉ़ शुभा राऊळ आणि काँग्रेसमधून शीतल म्हात्रे यांनी घोसाळकर यांची कोंडी करीत त्यांना पराभवाची धूळ चारली़ चौधरी ३८ हजार मताधिक्याने विजयी झाल्या़ (प्रतिनिधी)
आजी-माजी १२ नगरसेवकांना आमदारकीची लॉटरी
By admin | Updated: October 20, 2014 02:39 IST