Join us  

जेएनयू, सीएएवरून विद्यार्थ्यांना भ्रमित करण्याचा डाव्यांचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Published: January 09, 2020 6:05 AM

दोन दिवसांपासून होणाऱ्या घटना आणि डाव्यांच्या निदर्शनांमधील घोषणा ऐकल्यानंतर स्पष्ट होते की, जेएनयूमधील घटना हे फक्त निमित्त असून, त्याद्वारे आपले छुपे मनसुबे साध्य करण्याचा डाव्यांचा प्रयत्न आहे.

मुंबई : दोन दिवसांपासून होणाऱ्या घटना आणि डाव्यांच्या निदर्शनांमधील घोषणा ऐकल्यानंतर स्पष्ट होते की, जेएनयूमधील घटना हे फक्त निमित्त असून, त्याद्वारे आपले छुपे मनसुबे साध्य करण्याचा डाव्यांचा प्रयत्न आहे. जेएनयूमध्ये घटना घडते, त्याच वेळी मुंबईमध्ये उमर खालिदच्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते आणि मग शेकडोंचा जनसमुदाय गेट वे आॅफ इंडिया इथे एकत्र येतो आणि त्यामध्ये ‘फ्री काश्मीर’ असे फलक झळकावले जातात. हा सर्व घटनाक्रम पाहता, जेएनयूसारख्या एखाद्या विद्यापीठाला लक्ष्य करून संपूर्ण देशातील विद्यार्थ्यांमध्ये असंतोष आहे, असे दाखविण्याचे कारस्थान या माध्यमातून केले जात असल्याचा आरोप अभाविपने बुधवारी पत्रकार परिषदेद्वारे केला.टीस मुंबईमधील विद्यार्थ्यांना जेएनयू, सीएए विषयांवर भ्रमित करून, त्यांना रस्त्यावर आणण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप राष्ट्रीय मंत्री अनिकेत ओव्हाळ यांनी यावेळी केला. मुंबईत ‘फ्री काश्मीर’चे फलक दिसणे हे सगळे पूर्वनियोजित असून, जेएनयूला समोर करत मुंबईसह महाराष्ट्रात अराजकता पसरविण्याचे शहरी नक्षलवाद्यांचे षड्यंत्र असल्याचा गंभीर आरोप ओव्हाळ यांनी यावेळी केला.जेएनयूमधील घटनेत अभाविपचे २३ कार्यकर्ते जखमी असून, रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्याच वेळी महाराष्ट्र, गुजरात आदी राज्यांत अभाविपच्या कार्यालयांना आणि कार्यकर्त्यांना लक्ष्य करण्यात येत आहे. सीएएबाबत डावे आणि काँग्रेस समाजात अशांतता निर्माण करण्याचे काम करीत आहेत, परंतु त्यामध्ये अपेक्षित यश न मिळाल्यामुळे आता विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून, देशातील नागरिकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सर्व विरोधी पक्ष करत असल्याचे यावेळी अभाविप कोंकण प्रदेशमंत्री प्रेरणा पवार यांनी सांगितले. जेएनयूबाबत सर्व कलाकारांनी योग्य तो अभ्यास करून मत व्यक्त करण्याचे आवाहन यावेळी अभाविपचे राष्ट्रीय मंत्री अनिकेत ओव्हाळ यांनी केले.

टॅग्स :जेएनयू